
हमाल ते फर्निचर कंपनीचा मालक
झरे येथील गणेश अवताडे यांची
यशोगाथा
शिवतंत्र न्यूज

उद्योग, व्यवसाय कोणीही करू शकतो यासाठी कोणताही कोर्स किंवा वारसा असणे गरजेचे नसते हे सिद्ध करून दाखवले आहे झरे तालुका करमाळा येथील गणेश भगवान अवताडे यांनी . करमाळा जेऊर रोडवर माऊली फर्निचर मॉल या नावाने सुसज्ज फर्निचर कंपनी उभारत त्यांनी एक नवा अध्याय सुरू केला आहे. पूर्वाश्रमीच्या हमाली व्यवसाय करणाऱ्या युवकाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

गणेश अवताडे यांचे शिक्षण जेमतेमच. रोजी रोटी साठी ते कोल्हापूर येथे गेले.. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तसेच उत्पन्नाचा इतर मार्ग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हमालीचा मार्ग स्वीकारावा लागला. सुमारे दहा ते अकरा वर्ष त्यांनी हमालीचे काम केले . मात्र या नोकरीतून फारशी मिळकत मिळत नव्हती. गरजा पूर्ण होत्या मात्र स्वप्न पूर्ण होत नव्हती. नोकरी करून भविष्य नाही हे लक्षात येतात काहीतरी व्यवसाय केला पाहिजे याची त्यांना जाणीव निर्माण झाली. आणि मग विचारचक्र सुरू झाले. कोणता व्यवसाय करावा. बराच विचार केल्यानंतर फर्निचर व्यवसायाचे नाव समोर आले. व्यवसाय सुरू करताना त्या व्यवसायाचे परिपूर्ण ज्ञान असणे गरजेचे असते. तरच तो यशस्वी होतो .म्हणून त्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्या एका नातेवाईकांचे फर्निचर शोरूम कोल्हापूर येथे आहे . तेथे त्यांनी तीन वर्ष काम केले . यादरम्यान फर्निचर निर्मितीमध्ये सर्व बाबींची त्यांना माहिती मिळाली. दर्जेदार फर्निचर कसे तयार करायचे , या क्षेत्रातील बारकाव्यांची त्यांना परिपूर्ण माहिती झाली . गणेश अवताडे यांची करमाळा जेऊर रोड लागत जागा आहे . या जागेत व्यावसाय सुरू करण्याचा निर्णय झाला.
कुंभेज फाट्यानजिक त्यांच्या पन्नास बाय शंभर असे 5000 चौरस फूट असे भव्य दिव्य शेड उभारण्यात आले . शेड निर्मितीसाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च आला. तर व्यवसाय सुरू करेपर्यंत जवळ जवळ 60 लाख रुपये खर्च आला. आयुष्याची सर्व पूंजी , सोने नाणे मिळून भांडवल उभारणी केली. गणेश आवताडे हे सर्व साधारण शेतकरी कुटुंबातील होते. व्यापार व्यवसायाशी त्यांचा दूर दूर संबंध नव्हता. मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी धाडस केले होते. नऊ जानेवारी 2024 रोजी माऊली फर्निचर मॉल या व्यवसायास प्रारंभ झाला. अतिशय कष्टातून हा व्यवसाय उभारला असल्याने ग्राहक संतुष्ट होईल असे दर्जेदार काम करण्यासाठी सुरुवात केले. दिवाण, शोकेस, ड्रेसिंग टेबल, खुर्ची , कपाट अशी सर्व फर्निचर दर्जेदार मालामध्ये व कमीत कमी नफ्यामध्ये देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या दर्जाची चर्चा सर्वत्र होऊ लागली .इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये फ्रीज ,एलईडी, वॉशिंग मशीन, फॅन , मिक्सर , कुलर अशा सर्व नामांकित कंपनीमध्ये त्यांनी उपलब्ध केल्या. भांडी लग्न बस्त्याची त्यांनी विशेष सोय केल्यामुळे तसेच लग्न बस्त्यांसाठी विशेष सुविधा त्यांनी उपलब्ध केल्याने , फर्निचर भांडी लग्न बस्ता एकाच ठिकाणी होलसेल स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे दूरवरून ग्राहक येथे येतात. करमाळा तालुक्यातील जिंती, पारेवाडी, दहिगाव, जेऊर शहर, बार्शी, जामखेड, कुर्डूवाडी, परांडा , पुणे परिसरातील ग्राहक व व्यापारी येथे खरेदीसाठी गर्दी करतात. कंपनीमध्ये तीन कामगार व गणेश स्वतः काम करतात. भविष्यकाळात हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

शिक्षण, भांडवल, वारसा यापैकी काहीही नसताना शून्यातून आपले विश्व उभारणाऱ्या गणेश अवताडे यांची प्रेरणा घेऊन आपले बांधव वाटचाल करतील हीच अपेक्षा.




