कुर्डूवाडी

वडिलांच्या छत्रछायेविना संघर्ष करत कुर्डूवाडी चे जगताप बंधू बनले बिजनेस आयकॉन  टाइल्स क्षेत्रात मिळवला नावलौकिक

शिवतंत्र न्यूज

वडिलांच्या छत्रछायेविना संघर्ष करत कुर्डूवाडी चे जगताप बंधू बनले बिजनेस आयकॉन 

टाइल्स क्षेत्रात मिळवला नावलौकिक

शिवतंत्र न्यूज 

 

    मुलांच्या जडणघडणीत तसेच त्यांच्या व्यवसायिक उभारणीत आई-वडिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असते किंबहुना मुलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आई-वडील जीवाचे रान करत असतात. दोघांपैकी एका जणाची कमतरता मुलांमध्ये दूरगामी परिणाम करते. कुर्डूवाडी येथील स्व सोमनाथ जगताप यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी अनपेक्षितपणे कोसळलेल्या संकटातून सावरत प्रचंड जिद्दीच्या जोरावर टाइल्स व्यवसायात नावलौकिक मिळवला आहे. त्यांचा आजवरचा औद्योगिक प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. 

      आदेश व आदित्य जगताप हे आज कुर्डूवाडी परिसरात टाइल्स क्षेत्रात युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात. अतिशय कमी वयात त्यांचे वडील स्व सोमनाथ जगताप यांचे आकस्मिक निधन झाले. स्व सोमनाथ यांचे नाव रियल इस्टेट, बांधकाम, फायनान्स क्षेत्रात प्रसिद्ध होते. यशस्वी व्यवसायिक म्हणून त्याची ओळख होती. वडिलांच्या अकाली जाण्याने जगताप परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र त्यांच्या मातोश्री श्रीमती वैशाली, आजोबा पांडुरंग जगताप यांनी परिवाराला सावरले. आदेश व आदित्य यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. आदेश यांनी बीबीए तर आदित्य यांनी बीए पर्यंत शिक्षण घेतले. वास्तविकपणे जगताप परिवाराची स्थावर मालमत्ता संपत्ती बऱ्यापैकी सक्षम होती. परंतु आदित्य व आदेश यांना व्यवसाय करून स्वयंपूर्ण व्हावे असे मनोमन वाटत होते. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी संकटांवर मात करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांना साथ दिली मातोश्री व आजोबा यांनी. व्यवसाय कोणता करायचा याचा अभ्यास त्यांनी करण्यास सुरुवात केली. करकंब ता पंढरपूर येथे त्यांचे मावसबंधू यांचे शिवकृपा मार्बल या नावाने टाइल्स शोरूम आहे. तसेच वडिलांनी रियल इस्टेट बांधकाम क्षेत्रात काम केल्यामुळे त्या क्षेत्राशी निगडित व्यवसाय म्हणून त्यांनी टाइल्स क्षेत्राची निवड केली. व्यवसाय करताना त्याची परिपूर्ण माहिती असली पाहिजे यासाठी आदेश करकंब आणि दौंड येथे काका संजय जगताप यांच्याकडे एक वर्ष राहिले. काका संजय जगताप यांनी दोन्ही भावंडांना खरेदी किंवा अन्य बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. मावसबंधूंकडे आणि काकांकडे या व्यवसायाची इत्तंभूत मार्गदर्शन घेतले. या ठिकाणी सर्व काम त्यांनी केले. 8 मार्च 2020 रोजी सोमनाथ ट्रेडर्स या नावाने व्यवसायाचा शुभारंभ केला. घरून मातोश्रीने दहा लाख रुपये दिले, काही नातेवाईकांनी पण मदत केली . सुरुवातीला काही नातेवाईकांनी श्रीमती वैशाली यांना मुलांना भांडवल देण्यास विरोध केला. पैसे हातात आल्यानंतर मुले बिघडतील , वाम मार्गाला लागतील अशी भिती दाखवली . मात्र मातोश्री आणि आजोबांनी या दोन्ही बांधवांवर पूर्ण विश्वास दाखवला. अशा प्रकारे अनंत अडचणींना सामोरे जात व्यवसाय सुरू झाला. व्यवसाय सुरू करताना दोन्ही बांधवांचे वय फक्त 20ते 22 होते. बऱ्याच जणांना वाटत होते या कोवळ्या पोरांना कशाचा व्यवसाय जमतो. मात्र मोठ्या जिद्दीने त्यांनी व्यवसाय उभारणी केली होती.

दुर्दैवाचा फेरा काही केल्या पीच्छा सोडवत नव्हता. व्यवसायाला सुरुवात होऊन पंधरा दिवस होत नाही तोवर देशामध्ये लॉकडाऊन घोषित झाले. एवढ्या अडचणींवर मात करून उभारलेल्या व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले . मात्र हा प्रश्न फक्त जगताप बांधवांचा नव्हता तर संपूर्ण देशाचा होता. त्यामुळे याही संकटाशी दोन हात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संपूर्ण कोरोना काळात जगताप बंधूंनी मजूर न लावता स्वतः मजुराची कामे केली. 100 ते 200 बॉक्स स्वतः गाडीमध्ये भरले. इतर सर्व कामे स्वतः केली. दोन्हीही बंधूंनी कष्टाची काम कधीही केली नव्हती, परंतु यशस्वी होण्यासाठी अशा छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागणार आहेत हे त्यांनी गृहीत धरले होते. टाइल्स व्यवसायासाठी भांडवल भरपूर लागते. तुटपुंज्या भांडवलामुळे पाहिजे त्या प्रमाणावर मालाची विविधता राखली गेली नाही. त्यानंतर बँकेमध्ये सीसी लोन घेऊन भांडवलात वाढ झाल्यावर त्यांनी विविध कंपनीचा माल विक्रीसाठी ठेवला. बँकेसोबत विश्वासाचे संबंध प्रस्थापित केले. या काळात खूप अडचणी आल्या. मित्रमंडळींनी तसेच काही नातेवाईकांनी टवाळी केली. मात्र या सर्वांवर मात करत कोरोना कालावधी संपेपर्यंत त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर व्यवसाय सुरू ठेवला. कोरोना नंतर व्यवसायात तेजी आली. सुरुवातीच्या काळात छोट्याशा शेडमध्ये व्यवसाय सुरू केला होता. नुकतेच त्यांनी प्रशस्त शोरुमचे बांधकाम करून तेथे व्यवसायाचे स्थलांतर केले. आज रोजी त्यांच्याकडे लिवोना, पारकोस,मिलिनियम आदि कंपन्यांच्या टाइल्स तसेच कडप्पा, ग्रेनाइट,तांदूर इतर सॅनिटरी वेअर उत्तम दर्जाचे मिळते. वडील सोमनाथ यांच्या जनसंपर्काचा त्यांना बराच फायदा झाला. त्यांना बापू म्हणून ओळखले जात होते. जगताप बंधूंचे मामा हरिदास गुंड हे भाच्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी खाजगी नोकरी सांभाळून या बांधवांना सर्वतोपरी मदत केली. सोमनाथ ट्रेडर्स येथे करमाळा, बार्शी, पंढरपूर ,टेंभुर्णी परिसरातून ग्राहक आवर्जून येतात. एकेकाळी हीणवल्या गेलेल्या बांधवांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करून नावलौकिक संपादन केला आहे. या पुढील काळातही अशीच वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगताप बंधू यांची करमाळा रोड लागत पाच एकर जागा आहे. याच ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे. येथे भविष्यात भव्य दिव्य शोरूम उभारणीचा संकल्प त्यांनी केला आहे.

   आपल्या यशस्वी कारकीर्दीचे रहस्य काय याबाबत बोलताना ते म्हणतात, मी प्रत्येक ग्राहकाला नफ्यापेक्षा त्याच्या समाधानाला प्राधान्य दिले. आमच्याकडे सर्वसाधारणपणे शेतकरी वर्गातील ग्राहक येतात. आम्ही त्यांना आमच्या मालाची गुणवत्ता, दर याबाबत पारदर्शकपणे माहिती देतो. ग्राहकांशी बोलताना तो गरीब असो की किंवा श्रीमंत असो त्याला सन्मानाने , प्रेमाने वागणूक देतो. त्याचे आर्थिक नुकसान होणार नाही याकडे परिपूर्ण लक्ष देतो. त्याच्यामुळेच एक समाधानी ग्राहक आम्हाला दहा नवीन ग्राहक मिळवून देतो. त्यामुळेच आमचा हा व्यवसाय उत्तमरित्या सुरू आहे.

      अनंत अडचणींवर मात करत यश शिखरावर पोचलेल्या जगताप बंधूंच्या प्रेरणेतून युवक प्रगती साधतील अशीच अपेक्षा.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close