कुर्डूवाडी

जिद्द व कठोर परिश्रमातून पशुखाद्य व दूध संकलन क्षेत्रात मिळवला नावलौकिक कुर्डूच्या ज्ञानदेव लोंढे यांचा प्रेरणादायी प्रवास 

शिवतंत्र न्यूज

जिद्द व कठोर परिश्रमातून पशुखाद्य व दूध संकलन क्षेत्रात मिळवला नावलौकिक

कुर्डूच्या ज्ञानदेव लोंढे यांचा प्रेरणादायी प्रवास 

शिवतंत्र न्यूज 

    कष्ट करण्याची तयारी व सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून असामान्य प्रगती करता येते हे सिद्ध करून दाखवले आहे कुर्डू तालुका माढा येथील ज्ञानदेव लोंढे यांनी. दूध संकलन व पशुखाद्य क्षेत्रात त्यांनी तालुक्यात लक्षवेधी कामगिरी केली आहे. 

ज्ञानदेव लोंढे कुर्डू तालुका माढा येथील एक सर्वसामान्य परिवारातील व्यक्ती. शिक्षणही जेमतेमच. मात्र स्वभाव सरळमार्गी. कष्ट करण्याची तयारी होती. प्रसंगी त्यांनी दुसऱ्याच्या शेतात देखील काम केले. शेळीपालनाची त्यांना प्रेरणा मिळाली. 2006 मध्ये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या साह्याने शेळी पालन प्रकल्प सुरू केला. बँक प्रकरण करताना त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. साठ हजार रुपये कर्जासाठी खूप मनस्ताप त्यांना सहन करावा लागला. मिळालेले 60 हजार रुपयांतून त्यांनी वीस शेळ्या खरेदी केल्या. एकाच वर्षात बँकेचे सर्व कर्ज त्यांनी व्याजासकट भरले. काटेकोर नियोजन करत उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच व्यवसायात यश मिळवले. दोनच वर्षात वीस शेळ्या वरून 275 शेळ्यांची संख्या झाली. शेळ्यांसोबतच त्यांनी संकरित गाई देखील विकत घेतल्या. 2009 मध्ये त्यांनी माऊली दूध संकलनाची सुरुवात केली. अगोदर पशुखाद्य मिळेल ते वापरत होते. चांगल्या उत्पादनासाठी पशुखाद्य देखील गुणवत्तापूर्ण लागत असते. गोदरेज कंपनीचे पशुखाद्य त्यांनी वापरण्यास सुरुवात केल्यानंतर दुधातील गुणवत्तेमध्ये त्यांना अमुलाग्र असा बदल दिसून आला. मात्र कुर्डूवाडी परिसरात त्यांना हवी असलेले पशुखाद्य मिळत नसल्याने त्यांनी गोदरेज कंपनीची डीलरशिप घेण्याचे ठरवले. 2021 मध्ये त्यांनी दूध संकलनाच्या जोडीने पशुखाद्य व्यवसाय देखील सुरू केला. गोदरेज कंपनीची धनलक्ष्मी, समृद्धी, बी 60, स्टार्टर, गोवर, हिप्पर आधी उत्पादने ग्राहकांना प्रचंड आवडू लागली. दूध उत्पादकांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे या उत्पादनाची मागणी देखील वाढू लागली. ज्ञानदेव लोंढे कमालीचे शिस्तप्रिय आहेत. व्यवहार करताना प्रत्येक बिल ते वेळेवर अदा करतात. बॅंकांचे हप्ते देखील त्याच तारखेला भरणे याकडे ते काटेकोरपणे लक्ष देतात. ज्या बँकांनी सुरुवातीच्या काळात त्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली त्याच बँका आज पाहिजे तेवढे कर्ज घेण्यासाठी आग्रह करत आहेत. दुध व्यवसाय प्रगतीपथावर पोहोचल्यानंतर त्यांनी शेळीपालनातील लक्ष कमी केले व गाई – कालवडींवर लक्ष केंद्रित केले. आज त्यांच्याकडे चांगल्या उत्तम ब्रीडच्या 32 व्या व 22 कालवडी आहेत. यापासून त्यांना प्रतिदिन 450 लिटर दूध उत्पादन मिळते. दोन कामगार व घरातील सर्व सदस्य या गायीची देखभाल करतात. हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाते. 200 टन मुरघास प्रतिदिन तयार केला जातो. गोदरेज पशुखाद्याची ते होलसेल व किरकोळ विक्री करतात. माढा तालुक्यात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कंपनीने त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवले आहे. परदेशात जाण्याची देखील त्यांना संधी मिळाली. इंडोनेशिया तसेच बँकॉक, व्हिएतनाम आदी देशांमध्ये त्यांना प्रवास करण्याची संधी मिळाली. त्यांचे सोबतचे सहकारी कंपनीने पुरविलेल्या सुविधांचा मनसोक्त आनंद घेत होते मात्र ज्ञानदेव लोंढे हे लहानपणापासूनच संस्कारित परिवारात वाढलेले होते. व्यसनापासून ते दहा हात दूर असत त्यामुळे हे सोन्याचे दिवस आल्याचे ते सांगतात. मुलगा सोहम, पत्नीसह प्रतिभा, आई निलावती हा संपूर्ण परिवार त्यांना मदत करतो. या सर्वांच्या कष्टाच्या जोरावर त्यांनी आठ एकर जमीन विकत घेतली. मातोश्री निलावती यांची प्रेरणा त्यांना ऊर्जा देऊन जाते. 65 वर्षे वय असताना त्यांनी चार शेळ्या सांभाळून 150 शेळ्यापर्यंत वाढ केली. या वयातही त्यांचा उत्साह कमालीचा आहे असे लोंढे सांगतात.

       सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात जेवढे उत्पन्न मिळत होते तेवढा सध्या इन्कम टॅक्स भरतो, हे सांगताना त्यांचा उर अभिमानाने भरून येतो. तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून व्यवसाय केल्यामुळेच पशुखाद्य व्यवसायाची उलाढाल पाच कोटीपर्यंत गेली तर दूध संकलनही एक हजार पाचशे लिटर पर्यंत पोहोचले आहे. नुकतेच त्यांनी महिला सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या इंदुजा परिवाराबरोबर करार करत त्यांच्यासोबत दूध संकलन सुरू केले आहे. या माध्यमातून महिलांना दूध व्यवसायात चांगली संधी मिळेल तसेच अनेक फायदे या माध्यमातून दूध उत्पादकांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिल. 

     आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की निर्व्यसनी राहिल्यामुळेच तसेच कष्टाला, चोख व्यवहाराला प्राधान्य दिले. ग्राहकाला तोटा होणार नाही, ग्राहक दुखावणार नाही याकडे विशेष लक्ष दिले.त्यामुळेच आपण प्रशिक्षित असून सुद्धा मी यशस्वी होऊ शकलो. तरुण वर्गाने व्यवसायाची लाज न बाळगता संधी मिळेल त्या व्यवसायात पुढे जावे. आपल्या मातापित्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. ज्ञानदेव लोंढे यांचा हा जीवन प्रवास नक्कीच युवकांना नवचेतना देऊन जाईल.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close