बिझनेस
कापड व्यवसायात मिळवले उत्तुंग यश सयाजी उद्योगसमूहांच्या अमोल रोकडे यांची संघर्षगाथा
शिवतंत्र न्यूज

कापड व्यवसायात मिळवले उत्तुंग यश
सयाजी उद्योगसमूहांच्या अमोल रोकडे यांची संघर्षगाथा
शिव तंत्र न्यूज
कापड व्यवसायात वर्षानु वर्षे जैन मारवाडी समाजाची मक्तेदारी राहिली आहे, मात्र करमाळा तालुक्यातील एका बहुजन व्यावसायिकाने या संकल्पनेला छेद देत तब्बल 17 वर्षे संघर्ष करत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 200 चौरस फुटाच्या छोट्याशा गळ्यातून सुरू झालेला हा प्रवास 4500 चौरस फुटाच्या आलिशान 4 मजली शोरूम पर्यंत येऊन ठेपला आहे.अमोल रोकडे यांच्या कापड विकासातील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

सौ माधुरी व अमोल रोकडे या दाम्पत्यांनी 2008 साली करमाळा येथे कमला भवानी रोडवर सयाजी कलेक्शन या नावाने 10× 20 या छोट्याशा जागेत सयाजी कलेक्शन या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. अमोल रोकडे हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत. या अगोदर त्यांनी करमाळा येथे ऑटोमोबाईल्स , मशिनरी दुकान आदी व्यवसायात जम बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही.अपयशाने खचून न जाता त्यांनी धाडसी निर्णय घेत कापड व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. तसे पाहता या अगोदर त्यांच्या परिवारात कोणीही कापड व्यवसायात नव्हते.या कमी पुढाकार घेतला तो सौ माधुरी यांनी. सुरुवातीला त्यांनी छोटीशी जागा असूनही त्यात शूटिंग, शर्टिंग लेडीज वेअर, किड्स वेअर आदी सर्व व्हरायटीचा माल ठेवला. माधुरीताईंमुळे महिला ग्राहक जास्त आकर्षित व्हायला लागले . तसे पाहायला गेले तर व्यवसायाचे ठिकाण फारसे गजबजलेले नव्हते. गावाच्या बाहेर असल्यामुळे लोकांची वर्दळ नसायची. परंतु रोकडे दांपत्याने हार मानली नाही. खरेदीची फारशी माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेस तोटाही सहन करावा लागला. एखादा माल बाजार भाव पेक्षा महाग विकल्यामुळे ग्राहकांची नाराजीही पत्करावी लागली . भांडवल हे तुटपुंजेच होते. फक्त पंधरा हजार रुपयात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. परंतु असे म्हणतात अनुभव हाच मोठा गुरु असतो. व्यवसायातील बारकवे , ग्राहकांना समाधानी करण्याचे कौशल्य ते अनुभवातून शिकले. संयम राखला.कामाला प्राधान्य दिले तसेच ग्राहकांचे समाधान यालाच प्राधान्य दिल्यामुळे बघता बघता व्यवसायाला गती मिळाली. ग्राहकांची संख्या वाढू लागली. सयाजी कलेक्शनची चर्चा व्हायला लागली. आणि 2013 मध्ये 1200 चौरस फुटाच्या जागेत भव्य दालन सुरू केले. यावेळेस रोकडे दाम्पत्य यशस्वी झाले होते .कापड व्यवसायाच्या अगोदरच्या व्यवसायात आलेले अपयश त्यांनी कापड व्यवसायात यश मिळवून धुवून टाकले तब्बल आठ कामगारांना यावेळी सयाजी कलेक्शनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला. फॅन्सी, आकर्षक कपडे उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांची रीघ सुरु झाली. शहरातील नामांकित दुकानांच्या बरोबरीने फ्रेश स्टॉक वेळोवेळी राखल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत नवीन ग्राहक वळले गेले. इतर दुकानांच्या तुलनेत कमी दर असल्यामुळे प्रगतीचा आलेख चढताच राहिला. आता बाराशे चौरस फुटाची जागा ही अपुरी पडू लागली .लग्न बस्त्याची ही सोय उपलब्ध होती .परंतु जागा कमी पडू लागली. ग्राहक संख्या वाढली व त्यामुळे इच्छा असूनही मालामध्ये विविधता जपतांना अडचणी येऊ लागल्या. करमाळा परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांकडून होलसेल मालाची विचारणा होऊ लागली.सर्वांचे समाधान कसे करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला.

सौ माधुरी व अमोल रोकडे यांनी धाडसी निर्णय घेत एक भव्य दिव्य दालन उभे करण्याचा निर्णय घेतला . करमाळा शहरातील जुन्या बायपास लगत मोठी जागा खरेदी केली आणि सुमारे 4500 चौरस फूट जागेत चार मजली सयाजी फॅशन हे भव्य दालन उभे राहिले. या नूतन दालना संदर्भात बोलताना ते म्हणाले की सयाजी फॅशन मध्ये लग्न बस्त्या साठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्या इमारतीमध्ये जागे अभावी व्हरायटी मेंटेन करता येत नव्हती .आता येथे विविध वस्त्र परिवारातील असंख्य व्हरायटी पाहायला मिळेल. तसेच महिला भगिनींसाठी ब्रँडेड कंपनीचे विशेष दालन (बुटिक ) ही आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठी होलसेल विभाग ही तयार करण्यात आला आहे. आता करमाळा तालुक्यातील नागरिकांना खरेदीसाठी बाहेर तालुक्यात ,जिल्ह्यात जावे लागणार नाही, अशा प्रकारचे गुणवत्तापूर्ण व असंख्य व्हरायटी राखण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा हा नावीन्यपूर्ण प्रयत्न करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना नक्की आवडेल.

व्यवसाय करत असताना त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सयाजी व जयाजी ही दोन मुले आहेत. सयाजी एमबीबीएस दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे तर धाकटा जयाची वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असताना मुलांना व्यवसाय शिक्षण देण्यासाठी विसरले नाहीत .दोन्ही मुले सुट्टी मध्ये दुकानात उपस्थित राहून वडिलांना व आईला मदत करत असतात.




