करमाळाबिझनेस

ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळाली नवी ओळख ;जिद्द आणि संघर्षाची अनोखी यशोगाथा

शिवतंत्र न्यूज नेटवर्क

ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळाली नवी ओळख ; जिद्द आणि संघर्षाची अनोखी यशोगाथा

शिवतंत्र न्यूज नेटवर्क

करमाळा तालुका प्रतिनिधी

 

  ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळाली नवी ओळख ;जिद्द आणि संघर्षाची अनोखी यशोगाथा

   करमाळा येथील कैलास यादव सर यांनी सुरुवातीच्या काळात असंख्य व्यवसाय प्रामाणिकपणे करत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांची अनोखी यशोगाथा तरुणाईला नक्कीच स्फूर्ती देणारी आहे.‌

 

    कैलास बन्सी यादव, मुळगाव डोणगाव , तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. शिक्षण MSC DED . एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परिस्थिती बेताचीच होती . वडिलांचे 1989 मध्येच निधन झालेले.मात्र मनात जीगिशा प्रचंड होती. परिस्थिती बदलण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणासाठी वाटेल ते काम करत त्यांनी कधी कोणाच्या दुकानावर तर कधी मेडिकलवर पार्ट टाइम जॉब स्वीकारला. कष्टाची लाज त्यांनी कधीही धरली नाही. नंतर एका दुध डेअरीवर त्यांना काम मिळाले. या दुध डेअरीचे संकलन अगोदर 300 लिटर प्रतिदिन होते, मात्र कैलास यादव यांनी हात कामकाज हातात घेतल्यानंतर 300 लिटरचे संकलन 1300 लिटर पर्यंत गेले. अतिशय सचोटीने हे काम केले. मात्र चेअरमन यांच्या घरातील अंतर्गत कलहामुळे त्यांनी या क्षेत्राला रामराम ठोकला. त्यानंतर आष्टी येथील एका ऑटोमोबाईल मध्ये त्यांनी काही दिवस काम केले . फक्त अनुभवासाठी आणि आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे काम केले. बोअरवेल्स क्षेत्रात देखील त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तीन ते चार वर्षे त्यांनी इमाने इतवारे हा व्यवसाय केला मात्र. या व्यवसायात देखील यादव सर यांचे मन रमले नाही. त्यानंतर ज्यूस सेंटर देखील हा नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केला. गुणवत्तेच्या जोरावर दूरवरून असंख्य ग्राहक त्यांच्याकडे येत होते. सुमारे चार वर्षे त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे केला . मात्र नियतीला त्यांच्या हातून वेगळेच काम करून घ्यायचे होते. जागा दुसऱ्याची असल्यामुळे हा व्यवसाय फार काळ चालू शकला नाही . पावभाजी सेंटर देखील त्यांनी एक वर्ष चालवले. एक-दोन वर्षे लॉटरी सेंटर देखील त्यांनी चालवले. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह करमाळा तालुक्याचे जेष्ठ नेते विलासराव घुमरे सर यांच्या जवळच्या नात्यात झाला. 2002 – 2003 मध्ये त्यांना करमाळा येथील नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय येथे अध्यापनाचे काम मिळाले .अध्यापक विद्यालयात रुजू झाल्यानंतर त्यांनी त्यांचे D ED पूर्ण केले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्यामुळे ते विद्यार्थी वर्गात लाडके होते. 2009 मध्ये त्यांना करमाळा येथील दिगंबरराव बागल पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून जबाबदारी मिळाली. ज्यावेळी त्यांच्याकडे ही जबाबदारी आली होती त्यावेळी हा पेट्रोल पंप सुमारे 50 ते 60 हजार रुपये तोट्यात होता. कैलास यादव यांनी पदभार घेतल्यानंतर महिन्याचा नफा 18 लाखांवर गेला. शहर व परिसरातील व्यापारी नागरिक यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. 2017 पर्यंत असेच चालले. त्यानंतर त्यांनी हा जॉब सोडला.

      आता काय करायचे हा प्रश्न समोर आला याच दरम्यान २००९ मध्ये प्रचंड दुष्काळ पडला व पाणी टंचाई निर्माण झाली. कैलास यादव यांनी एक टँकर विकत घेतला. पंचायत समिती करमाळा यांच्याकडे पाणी वाहतूक करण्यासाठी भाडे तत्त्वावर हा टँकर त्यांनी लावला. यातून प्रत्येक महिन्याला त्यांना एक लाख रुपये नफा मिळाला . 18 महिने हा टँकर सुरू होता. 18 लाख रुपये एवढा फायदा त्यांना या माध्यमातून झाला. या पैशांमध्ये आजपर्यंत केलेली बचत मिळून त्यांनी गावाकडे 35 लाख रुपये किमतीची 10 एकर जमीन विकत घेतली. वडीलोपार्जित असलेली पाच एकर जमीन त्यांनी दोन भावांना स्वखुशीने दिली. कारण त्यांच्या संघर्षात तसेच शिक्षण घेताना भावांनी मोलाची साथ दिली होती .कैलास यादव सरांचा संघर्ष काही संपायला तयार नव्हता .करमाळा पेट्रोल पंपावरील जॉब सोडल्यानंतर आणखी एक पेट्रोल पंप चालवायची ऑफर मिळाली. जवळ भांडवल नव्हतेच. तरीपण मित्रांकडून उसने पैसे घेऊन हा व्यवसाय सुरू केला. परंतु हा व्यवसाय तोट्याकडे जात आहे असा अंदाज येताच काही महिन्यातच गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग त्यांनी घेण्यास सुरुवात केली. काहीतरी भव्य दिव्य करणाची इच्छा मनात असल्यामुळे तसेच या व्यवसायात फारसे भविष्य नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांनी राम राम ठोकला.

    कैलास यादव यांच्या आयुष्याचा आयुष्याला वळण देणारा टर्निंग पॉईंट आलाच. कमला भवानी रोडवर कर्जत येथील नलवडे यांचे खडी क्रशरचे ऑफिस होते . या ठिकाणी मॅनेजर पदावर काम करण्याची त्यांना ऑफर मिळाली. पगारही उत्तम होता .हे सर्व सुरळीत चालू होते. कॅश घेऊन त्यांना बँक ऑफ इंडिया मध्ये जमा करण्यासाठी जागे लागे. असेच एके दिवशी बँकेच्या व्यवस्थापक यांनी बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्या विषयी त्यांना विचारले. त्यांनी होकार दिला . त्या अगोदर IIBF ही परीक्षा द्यावी लागते. ती ही त्यांनी उत्तीर्ण केली. आणि अखेर 2018 मध्ये या ग्राहक सेवा केंद्राचा कारभार सुरू झाला . या अगोदर खूप काही अनुभव आले असल्यामुळे ही संधी सोडायची नाही अशी खुणगाठ त्यांनी मनात बांधली होती. पहिल्या महिन्यात तेरा दिवस भरले .या 13 दिवसांचा मोबदला त्यांना 5300 एवढा मिळाला. दुसऱ्या महिन्यात 20000, तिसऱ्या महिन्यात 40000 असा चढता आलेख सुरू झाला. आणखी आणि यादव सरांनी मागे वळून पाहिलेच नाही.

    गेली सात वर्षे त्यांचा हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्या स्वभावातील चांगुलपणा ,विनम्र व तत्पर सेवा यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे शहरात इतर अनेक ग्राहक सेवा केंद्र, बँक असताना त्यांच्याकडे मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ग्राहकांची वर्दळ असते. ग्राहक सेवा केंद्राच्या अगोदर त्यांनी अगणित व्यवसाय केले असल्यामुळे या व्यवसायातील चांगल्या अनुभवाचा उपयोग त्यांना ग्राहक सेवा केंद्राच्या कामकाजामध्ये झाला.

       या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी करमाळा येथे कमलाभवानी रोड लगतच असलेली 44 × 50 एवढी जागा 39 लाखांना विकत घेतली .एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांना स्थैर्य लाभले .याच क्षेत्रात कार्यरत राहण्याचा व त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे .

     या सर्व प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पूर्णांगिणी सौ रुपाली यांची. कैलास सरांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरे आली , मात्र रूपालीताई सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. डीएड कॉलेजचा जॉब सोडल्यानंतर सरांना एका शब्दाने देखील विचारले नाही. कैलास सरांनी कोचिंग क्लासेस सुरू केल्यानंतर त्या सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिकवण्याचे काम करू लागल्या. ग्राहक सेवा केंद्र सुरू केल्यानंतर त्यांनी सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया चे ग्राहक सेवा केंद्र सुरुवात करून त्यांना हातभार लावला . आज मितीला दोघेही बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र चालवत आहेत. कैलास सरांना दिवसभर ऑफिसमध्ये बसावे लागते. त्यामुळे कुटुंबातील नातेवाईकांचे विवाह समारंभ, सुखदुःखाचे प्रसंग, आदी सर्व कामे त्यांनीच पार पाडली. कैलास यांना दोन मुले, आई असा गोड परिवार आहे. सौ रूपाली यांनी जर साथ दिली नसती तर मी यशस्वी वाटचाल करू शकलो नसतो, असे कैलास सर म्हणतात. माझ्या या प्रवासात सौ रुपाली यांचे अनन्यसाधारण योगदान आहे असेही यादव सर म्हणतात.

    अनेक अडचणींना सामोरे जात अनेक विविध व्यवसाय करत ज्वलंत इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वी झालेल्या कैलास यादव सर यांच्या प्रेरणेतून असंख्य उद्योजक, व्यावसायिक घडतील अशी आशा आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close