कुर्डूवाडी
ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिली संजीवनी दगडू दादा चोपडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना केले स्वयंपूर्ण
शिवतंत्र न्यूज

ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिली संजीवनी
दगडू दादा चोपडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना केले स्वयंपूर्ण
शिवतंत्र न्यूज

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो शेती. शेतकरी सक्षम झाला तरच आपला देश प्रगतीपथावर जाऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे प्रयत्न करण्यात येतात. कव्हे तालुका माढा येथील दगडू दादा चोपडे हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेषता ग्रामीण महिलांना सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. एक व्यक्ती काय करू शकतो याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या या असामान्य कामगिरीबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. विकास महिला ग्राम संघाच्या माध्यमातून महिलांना त्यांनी आर्थिक स्वयंपूर्ण केले आहे. शेती व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकीतून काम करणारे दगडू दादा यांची ओळख परिसरात अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून आहे. श्री महालक्ष्मी उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांचे किराणा दुकान , गिफ्ट हाऊस, बायोटेक नर्सरी असे विविध व्यवसाय सुरू आहेत. 45 बचत गटांना त्यांनी मार्गदर्शन करून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले आहे.
दगडू दादा यांचे वडील पितांबर चोपडे यांचा गावातच टेलरिंग व्यवसाय होता. सुरुवातीला परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आपल्या मातोश्रींबरोबर शेतात काम करत असत . सर्वांना सोबत घेऊन जाण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या मातोश्रींकडून मिळाली. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दूध डेअरीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 50 लिटर पासून दूध संकलनाला सुरुवात झाली. आपल्या मनमिळावु व प्रेमळ स्वभावाच्या जोरावर 2200 लिटर प्रतिदिन दूध संकलन होऊ लागले. दूध संकलनाच्या माध्यमातून लोकांबरोबर प्रत्यक्ष त्यांचा संबंध आला. शेतकऱ्यांना दूध व्यवसाय व इतर अडीअडचणीच्या प्रसंगी बचत गट असल्यास फायदा होईल असा विचार दादांच्या मनात आला. त्यातूनच त्यांनी चार महिला व 1 पुरुष बचत गट स्थापन केले. महिला बचत गटात 60 तर पुरुष बचत गटात बारा सभासद होते. बचत थोडीशीच असल्यामुळे फारशी उलाढाल होत नव्हती. त्यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून त्यांनी प्रत्येक गटाला एक लाख रुपये नाबार्ड करून मंजूर करून आणले. दगडू दादांनी सर्व सदस्यांनी कर्ज,व हप्ता वेळेवर भरण्याची शिस्त लावली. सर्व सदस्यांनी वेळेवर परतफेड केल्यानंतर 15 लाख रुपये त्यांनी पुन्हा मंजूर करून आणले. सदस्यांना सबसिडी देखील मिळाली. ज्यातून सदस्यांचा उत्साह द्विगुणित झाला प्रत्येक सभासदांना 40 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून गाय वाटप केले. एवढ्यावर न थांबता त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून कीटकनाशके, बी बियाणे तसेच कृषी सेवा केंद्र सुरू केले. गावासोबतच परिसरातील शेतकऱ्यांना याचा खूप फायदा झाला. सोबतच महालक्ष्मी उद्योग समूहाची त्यांनी स्थापना करत सिमेंट एजन्सी, किराणा दुकान सुरू करत स्वतः देखील स्वयंपूर्ण झाले. शेती उत्तम करायची असेल तर माती सशक्त लागते. या भूमिकेतून त्यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला. प्रति महिना 1000 पोती गांडूळ खताची माफक दरात विक्री देखील करतात. बचत गटाच्या माध्यमातून लोकांना गाव पातळीवर भांडवल उपलब्ध झाल्याने सावकार शाहीचा नायनाट झाला. तालुक्याचे नेते आमदार बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, धनराज दादा शिंदे, आप्पासाहेब उबाळे, शहाजी शिंदे, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुधीर कांबळे यांचे वेळोवेळी सहकार्य घेऊन ग्रामस्थांना विविध योजना राबवण्याचे ते काम करतात. अजातशत्रू म्हणून ते ओळखले जातात. महात्मा गांधी तंटामुक्त समितीची अध्यक्ष पद देखील आजतागायत गेल्या 8 वर्षापासून तेच सांभाळत आहेत. सुनबाई सौ सोनल वैभव चोपडे या सीआरपी म्हणून काम करतात . किराणा दुकान तसेच दादांना सर्व कामात त्या मदत करतात. सौ रेणुका ढेरे , सौ संगीता चोपडे, श्रीमती मैना मांगले, सौ मनीषा ढेरे अफसाना सय्यद, विनोद ढेरे यांचे देखील मोलाचे सहकार्य दादांना मिळते. गावातील परिसरातील नागरिकांना अडीअडचणी, पीक मार्गदर्शन यासाठी दररोज दोन ते तीन तास दादा राखून ठेवतात. आज रोजी बचत गटाचे भाग भांडवल दोन कोटी रुपयांच्या आसपास आहे. दरवर्षी सभासदांना लाखो रुपयांचे बोनस वाटप बचत गटाच्या माध्यमातून केली जाते.





