tembhurni

अभ्यासपूर्ण निर्णयांच्या जोरावर विविध व्यवसायात यशस्वी वाटचाल  टेंभुर्णीच्या आकाश पाटील यांचा प्रेरणादायक प्रवास

शिवतंत्र न्यूज

अभ्यासपूर्ण निर्णयांच्या जोरावर विविध व्यवसायात यशस्वी वाटचाल

 टेंभुर्णीच्या आकाश पाटील यांचा प्रेरणादायक प्रवास

शिवतंत्र न्यूज 

      कॉस्मेटिक्स, टायर किंवा ट्रॅव्हल्स व्यवसायात मराठा बांधव तुलनेने कमी आढळतात. मात्र या व्यवसायात टेंभुर्णी येथील आकाश पाटील या व्यवसायिकांनी अकरा वर्षे खडतर परिश्रम करत उत्तुंग यश मिळवले आहे. नंदादीप कॉस्मेटिक, नंदादीप व्हील अलाइनमेंट व कार केअर, पंचम टूर्स अँड ट्रॅव्हल्स या त्यांनी सुरू केलेले व्यवसाय आजरोजी यशस्वीपणे सुरू आहेत. सर्वसाधारणपणे एक व्यवसाय चालवायचा म्हटलं तरी नाकी नऊ येतात. अशी परिस्थिती असताना आकाश पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची एक नवी ओळख टेंभुर्णी परिसरात झाली आहे .

    आकाश दिलीप पाटील मुळगाव टेंभुर्णी. वडील जलसंपदा खात्यात नोकरीला होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात आकाश यांची जडणघडण झाली. आकाश यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरी करण्यात आकाश यांना रस नव्हता. त्यामुळे एखादा व्यवसाय सुरू करावा असे त्यांना मनोमन वाटायचे. आकाश यांचे नातेवाईक बारामती येथे आहेत. त्यांचा बिल्डिंग मटेरियल चा व्यवसाय आहे. या व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी ते बारामतीला गेले. मात्र या व्यवसायात लागणारी भांडवल गुंतवणूक बरीच असल्याने दुसरा व्यवसाय त्यांनी शोधण्यास सुरुवात केली. येथेच त्यांच्या एका दुसऱ्या नातेवाईकांचा ब्युटी पार्लर व्यवसाय आहे. त्यांनी सौंदर्यप्रसाधने व्यवसाया संदर्भात आकाश यांना माहिती दिली. या व्यवसायाचे अर्थकारणात यांच्या लक्षात आले. तांत्रिक माहिती घेऊन आकाश यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. भांडवल गुंतवणूक तुटपुंजीच होती. फक्त साडेतीन लाख भांडवलावर त्यांनी 2015 मध्ये हा व्यवसाय सुरू केला. 16 बाय 20 एवढी जागा त्यांनी भाड्याने घेतली होती. सौंदर्यप्रसाधने, लेडीज पर्स , सर्व प्रकारच्या ब्युटी मशिन्स , डिओ, अत्तरे, इमिटेशन ज्वेलरी आदी साहित्य त्यांनी विक्रीसाठी ठेवले होते. या व्यवसायात त्यांचे कोणीही नव्हते तसेच पूर्वानुभव नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. दोन ते तीन वर्षे त्यांनी ना नफा न तोटा या तत्त्वावर दुकान चालवले. 2018 नंतर त्याचा व्यवसाय नावारूपाला येऊ लागला. नंतरच्या काळात सौंदर्य प्रसाधनांच्या श्रेणीमध्ये त्यांनी वाढ केली. सर्व ब्रँडेड कंपन्यांचे डिओ , शाम्पू तसेच इतर सर्व साहित्य उपलब्ध केले. नंदादीप चे वैशिष्ट्य म्हणजे आजही येथे टेंभुर्णी परिसरात जे सौंदर्य प्रसाधने उपलब्ध नसतात ते नंदादीप मध्ये हमखास मिळतात. टेंभुर्णी शहरच नाही तर परिसरातून, इतर तालुक्यातून देखील महिला ग्राहक त्यांच्याकडे आवर्जून येतात. 

     कॉस्मेटिक व्यवसायात जम बसवल्यानंतर आकाश यांच्या मनात आणखी एखादा व्यवसाय सुरू करावा असा विचार करू लागला. बारामती येथे त्यांच्या मित्राचे अष्टविनायक कार केअर नावाने कार केअर सेंटर आहे. त्यांच्या प्रेरणेतून आकाश पाटील यांनी कार केअर क्षेत्रात नंदादीप कार केअर या नावाने व्यवसायाचा प्रारंभ केला. 2024 मध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. या ठिकाणी तब्बल सहा कामगार काम करतात. कुर्डूवाडी रोडवर त्यांच्या वडिलांनी 1998 मध्ये सहा गुंठे जागा विकत घेतली होती. या जागेवर त्यांनी 50 बाय 100 एवढ्या जागेवर शेड उभारत हा व्यवसाय सुरू केला होता. योकोहोमा या जागतिक ब्रँड असलेल्या टायर्स ची डीलरशिप देखील आकाश यांच्याकडे आहे. या व्यवसायाचा त्यांनी अगोदरच अभ्यास केला असल्यामुळे फारशी अडचण त्यांना आली नाही. व्यवसाय सुरू होऊन दोन वर्षे झाली. ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे.आकाश यांचे वडील दिलीप हे आकाश यांना व्यवसायात मदत करतात. तसेच त्यांच्या सौभाग्यवती देखील त्यांना मदत करतात. वेळ शिल्लक राहत असल्यामुळे आणखी एखादा व्यवसाय करता येतो का याची चाचपणी त्यांनी सुरू केली. त्यांचे चुलते विठ्ठल पाटील यांचे अगोदरच पंचम टूर्स या नावाने ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. त्यामुळे या ट्रॅव्हल व्यवसायात नशीब आजमवयाचे त्यांनी ठरवले. 2025 मध्ये त्यांनी फोर्स कंपनीची अरबेनिया ही 16 सीटर मिनी ट्रॅव्हल्स गाडी विकत घेतली. पंचम टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने नवीन व्यवसायाचा शुभारंभ त्यांनी केला. बोलका, मनमिळाऊ स्वभाव, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी या उपजत गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर या व्यवसायातही त्यांनी बाजी मारली. अल्पावधीत त्याच्या ट्रॅव्हल्स व्यवसायाची परिसरात प्रसिद्धी झाली. विविध प्रकारच्या ऐतिहासिक धार्मिक, शैक्षणिक, कौटुंबिक सहली, विवाह सोहळे, सेमिनार यासाठी देशभरात जाण्यासाठी त्यांच्या गाडीला मागणी असते.पंचम टूर्स अँड ट्रॅव्हल्सने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. सुरक्षित प्रवास, ओळखीच्या जोरावर प्रवाशांची इतर राज्यात देखील निवासाची, जेवनाची सोय आकाश पाटील करतात. त्यामुळे पंचम सोबत प्रवास म्हणजे एक वेगळा अनुभव यात्रेकरू पर्यटक यांना असतो. गाडी आणल्यापासून क्वचितच प्रसंगी गाडी घरी असते. समाधानकारक व कोणत्याही त्रासाविना प्रवास झाल्यामुळे पंचम ट्रॅव्हलची शिफारस पर्यटक करतात.  

     तीन-तीन व्यवसाय सांभाळत असतानाही आकाश पाटील यांची ग्राहकांशी नाळ घट्ट आहे. कोणताही ग्राहक नाराज होणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेतात. आपल्या बांधवांना संदेश देताना ते म्हणतात, प्रत्येक तरुणाने बाजारपेठेचा अभ्यास करूनच व्यवसायात उतरावे. तसेच व्यवसाय सुरू केल्यानंतर यशस्वी होण्यासाठी कमीत कमी 1000 दिवस वाट पाहावी तरच तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. कोणत्याही व्यवसायाचा कणा म्हणजे ग्राहक. ग्राहक समाधानी तर व्यवसाय यशस्वी म्हणून ग्राहकांचे समाधान व्हावे यासाठी गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास प्राधान्य द्यायला हवे. व्यवसाय निवडताना जे व्यवसाय कमी आहेत त्यांचा अभ्यास करून नावीन्यपूर्ण व्यवसायाची निवड केली तर उद्योगात यशस्वी होता येते असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या बांधवांना दिला आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close