Uncategorized

शिव विचारातून समृद्धीकडे वाटचाल दत्ताजी शिंदे यांच्या सह्याद्री परिवाराची गौरव गाथा 

शिवतंत्र न्यूज

शिव विचारातून समृद्धीकडे वाटचाल

दत्ताजी शिंदे यांच्या सह्याद्री परिवाराची गौरव गाथा 

शिवतंत्र न्यूज 

    अनिष्ट रूढी, प्रथा परंपरांच्या जोखडातून बहुजन समाजाला मुक्त करण्याचे काम महापुरुषांनी केले. राष्ट्रमाता जिजाऊंनी पुण्याच्या छाताडात रोवलेली अंधश्रद्धेची गुलामगिरीची पहार उचकटून सोन्याचा नांगर हाकला. समाजाला नवविचारांची प्रेरणा दिली. महाराष्ट्राच्या मातीत स्वतंत्र्याची ज्योत प्रज्वलित करून शिवबा राजांच्या माध्यमातून रयतेचे राज्य निर्माण करण्याचे काम स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनी केले. या सर्व बहुजन महापुरुषांची प्रेरणा घेऊन स्वतःची वेगळी ओळख माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील मराठा उद्योजक दत्ताजी शिंदे यांनी केली आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत संयम राखून शिवशंभू विचारांवर मार्गक्रमण करत एक आदर्शवत उद्योग श्रृंखला निर्माण केली आहे. 

    माढ्याजवळच असलेले शिंदेवाडी हे त्यांचे छोटेशे गाव. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असल्याने मिळेल ते काम करत त्यांनी वाटचाल सुरू केली. चुरमुरे पिवळे करून विकणे, रस्त्यावर गोळ्या बिस्किट विकणे, तुळशी विवाह प्रसंगी बाजारात बांगड्या विकणे, जत्रेत खेळणी विकणे, कॅलेंडर विक्री, वर्तमानपत्र विक्री, भंगार विक्री खरेदी, जुनी पुस्तके खरेदी व विक्री, पान टपरी असे एक ना अनेक व्यवसाय जिद्दीने केले. युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या बूट पॉलिश ते तेल मालिश पर्यंतचे कोणतेही व्यवसाय न लाजता करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी या व्यवसायाकडे सन्मानाने पाहत वाटचाल सुरू ठेवली. कालांतराने माढा शहरात सह्याद्री जनरल स्टोअर्स त्यांनी सुरू केले. सोबतच चप्पल चे शोरूम देखील सुरू केले. गेले पंधरा वर्षे त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. अतिशय क्रांतिकारी विचारांचा पगडा दत्ताजींवर झाला आहे. त्यांचे लग्न त्यांनी कोणत्याही प्रकारची पूजा अर्चना न करता सत्यशोधक पद्धतीने विना ब्राह्मण केले. दुकानाचा शुभारंभही भिकाऱ्याच्या हस्ते केला. कोणताही निर्णय घेत असताना समाज काय म्हणेल याचा विचार डोक्यातून काढला पाहिजे असे दत्ताजी म्हणतात. दत्ताजींचा सर्व परिवार उद्योगी आहे. थोरले चिरंजीव एका नामांकित वृत्तवाहिनीसाठी पत्रकार म्हणून काम करतात तर दुसते चिरंजीव स्वराज्य मेडिकल हा व्यवसाय पाहतात. त्यांच्या सौभाग्यवती शिवमती शारदा या सहेली मॅचिंग सेंटर चालवतात. सुनबाई शिवमती धनश्री , शिवमती भाग्यश्री या जिजाऊ सृष्टी महिला बचत गट व विणकाम सेंटर चालवतात. दत्ताजींनी माढा येथे सह्याद्री फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल सुरू केला. येथे सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सर्व प्रकारचा भांडी लग्न बस्ता होलसेल दरात मिळतो. कमीत कमी नफा व ग्राहकांचे समाधान हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना सेवा देण्याचे काम दत्ताजी शिंदे करतात. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचे जय जिजाऊ जय शिवराय म्हणत अभिवादन करतात. येणारा प्रत्येक ग्राहक खरेदी न करता गेला असे कधीच होत नाही. आपला स्वभाव शांत संयमी व लवचिक असेल तर आपण शंभर टक्के यशस्वी होतो अशी दत्ताजींची धारणा आहे. व्यवसाय करताना चारित्र्य चांगले असणे गरजेचे असते. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा मान सन्मान करण्याचे काम दत्ताजी करतात. आदरार्थी वागणूक मिळाल्यामुळे हा ग्राहक त्यांच्या मित्राला नातेवाईकाला दत्ताजींच्या व्यवसायाबद्दल सकारात्मक शिफारस करतात.  

   मेन रोड वर दत्ताजी शिंदे यांचे सह्याद्री सुपर शॉपी या नावाने जनरल स्टोअर्स आहे. येथे शालेय साहित्य , ऑफिस स्टेशनरी, गिफ्ट, स्कूल बॅग, रुकवत साहित्य, चप्पल, शूज, फटाके तसेच अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू योग्य दरात मिळतात. मेन रोडवरच स्वराज्य मेडिकल हे मेडिकल दुकान गेल्या अनेक वर्ष सुरू आहे, माणसांची जनावरांच्या औषधी सवलतीच्या दरात मिळतात, तसेच मुरघास बॅग देखील इथे सवलती मध्ये मिळतात स्वतः विविध उद्योगांमध्ये कार्यमग्न असणारे दत्ताजी शिंदे सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत असतात. मराठा सेवा संघाच्या प्रेरणेतून काम करणाऱ्या मराठा उद्योजक कक्षाच्या माध्यमातून ते उद्योजक घडण्यासाठी उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन करतात. विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते करतात. व्यवसायाबरोबरच प्रबोधननाचे कामही ते आवडीने करतात. महापुरुषांच्या विचारांचे फक्त पारायण न करता आचरणात आणून काम करणारे दत्ताजी शिंदे यांनी त्यांची एक वेगळी ओळख माढा तालुक्यात निर्माण केली आहे. दत्ताजींनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. 

     आपल्या समाजात उद्योग व्यवसायाला पाहिजे तेवढे महत्त्व दिले जात नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असी8 अगोदर म्हटले जायचे. मात्र सध्या व्यापाराला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यापार शिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे असे दत्ताजी म्हणतात. मराठा समाजातील तरुण पिढीने व्यवसायात आले पाहिजे. व्यापाराची सुरुवात छोट्या पासूनच करायला हवी. व्यवसाय करताना येणाऱ्या अनुभवातून आपण झेप घेत असतो. नकारात्मक लोकांच्या संगतीत राहू नका असा मोलाचा संदेश ते व्यावसायिक बांधवांना देतात. व्यापारात यायचे असेल तर छोट्या अहंकारला बाजूला ठेवायला हवे. तुमचा अहंकार कमी झाला की तुम्ही व्यापाराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचू शकतात. डोक्यात छत्रपती व खिशात गांधीजी या सूत्रानुसार वाटचाल केल्यास तरुण वर्ग व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. असा मोलाचा संदेश त्यांनी उद्योजक व्यावसायिक बांधवांना दिला आहे. 

    अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महापुरुषांना आदर्श म्हणून सचोटींने छोटे-मोठे व्यवसाय करत यश शिखरावर पोहोचले दत्ताजी शिंदे यांची प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करण्याची गरज आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close