tembhurni

भाजीपाला व्यवसायातून साधली प्रगती  टेंभुर्णीच्या अण्णा दोंड पाटील यांच्या तरकारी उद्योगाची पंधरा वर्षे पूर्ण

शिवतंत्र न्यूज

भाजीपाला व्यवसायातून साधली प्रगती 

टेंभुर्णीच्या अण्णा दोंड पाटील यांच्या तरकारी उद्योगाची पंधरा वर्षे पूर्ण

शिवतंत्र न्यूज 

      व्यवसाय करण्यासाठी जागा, इमारत, भांडवल काहीही लागत नसते, लागते ती फक्त कष्ट करण्याची तयारी, जिद्द, महत्त्वाकांक्षा. एवढे असले की कोणताही व्यवसाय असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता हे सिद्ध करून दाखवले हे टेंभुर्णी येथील भाजीपाला व्यवसाय अण्णा दोंड पाटील यांनी. त्यांच्या आदित्य ट्रेडिंग कंपनी या व्यवसायाने तब्बल 15 वर्ष टेंभुर्णीकरांना अविरत सेवा दिली आहे. शेकडो ग्राहक त्यांच्याकडे भाजीसाठी गर्दी करतात.

    अण्णा दोंड पाटील यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील केम. केम येथून बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी पांगरे येथे व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर केले होते. पांगरे येथे त्यांचे किराणा दुकान होते. चार एकर शेती ही त्यांनी पांगरे येथे विकत घेतली होती. तसेच अण्णांकडे ट्रक देखील होता. ऊस वाहतुकीसाठी त्याचा ते वापर करत होते. बराच काळ त्यांनी ऊस वाहतूक केली. त्यांचे सासरे पांडुरंग शितोळे यांचा पंढरपूर येथे भाजीचा स्टॉल होता. बऱ्याच वर्षापासून ती भाजीपाला व्यवसाय करत होते.ट्रक व्यवसायात बऱ्याच अडचणी येऊ लागल्यानंतर अण्णांनी हा व्यवसाय बंद केला. त्यानंतर अण्णांचे सासरे शितोळे यांनी अण्णांना भाजीपाला व्यवसायातील गणित समजावून सांगितले. 2011 मध्ये अण्णांनी टेंभुर्णी तालुका माढा येथे इरिगेशन कॉलनी समोर कुर्डूवाडी रोडवर भाजीपाला स्टॉल सुरू केला. दर्जेदार भाजीची खरेदी कशी करायची, विक्री कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, ग्राहकाशी संबंध कसे प्रस्थापित करायचे आदींबाबत त्यांचे सासरे पांडुरंग शितोळे यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानुसार त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. येथे एमआयडीसीमध्ये कामगारांना भाजीपाला लागतो. 2011 मध्ये कुर्डूवाडी रोडवर फारशी वर्दळ नसायची. तरीसुद्धा अण्णांनी संयम राखत कामगार, स्थानिक नागरिक, यांना दर्जेदार भाजीपाला योग्य दरात देण्यास सुरुवात केली. प्रामाणिकपणाला सुरुवातीपासून प्राधान्य दिले. खराब भाजीपाला ग्राहकांना जाणार नाही याची दक्षता घेतली. टेंभुर्णी येथे वडापाव व्यावसायिक बऱ्याच प्रमाणावर आहेत. त्यांना इंदोर बटाटा लागतो. अण्णांनी हा बटाटा व्यवसायिकांना होलसेल स्वरूपात देण्यास सुरुवात केली. तसेच स्थानिक नागरिकांना वेफर्स बनवण्यासाठी, हॉटेल व्यवसायिक देखील होलसेल स्वरूपात बटाटा लागतो .अण्णांनी तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून ग्राहकांना आपलेसे केले. या कामी त्यांना सावलीसारखी मदत झाली ती त्यांच्या सौभाग्यवती सोनाली यांची. किराणा दुकान सौ सोनाली संभाळत होत्या. दुकान सांभाळून त्या अण्णांना मदत करत होत्या. पांगरे ते टेंभुर्णी बरेच अंतर होते भाजीपाला व्यवसायामुळे पाटील दांपत्याची दमछाक होत होती त्यामुळे नाईलाजाने त्यांनी किराणा दुकान बंद करून टेंभुर्णी येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. गेल्या पंधरा वर्षापासून अण्णांचा दिवस सकाळी सहाला उगवतो तर रात्री दहा वाजेपर्यंत दुकान सुरू असते.

      भाजीपाला व्यवसाय सुरू असला तरी त्यांनी आपल्या मुलाच्या आदित्यच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. आदित्य बी फार्मसी करत आहे. आदित्य ही अण्णांना व्यवसायात मदत करतो. संपूर्ण परिवाराने व्यवसायात झोकून दिल्यामुळे व्यवसायात प्रगती झाली. अण्णांनी बरेच दिवस भाड्याने खोली घेऊन दिवस काढले. व्यवसायात स्थिर झाल्यानंतर आण्णांनी जागा घेऊन बांधकाम केले.तसेच कुर्डूवाडी रोडवर 200 चौरस फुटांचा एक गाळाही विकत घेतला.

     ग्राहकाला सर्वस्व मानून अण्णांनी आजवर प्रवास केला आहे. आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना अण्णा दोंड पाटील म्हणतात, मी व्यवसाय करताना ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दरात भाजपाला देतो. त्यामुळे माझ्यावर ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत झाला. या विश्वासाला तडा जाणार नाही याची मी नेहमीच खबरदारी घेतली. तसेच व्यवसाय सोडून इतर बाबतीत लक्ष देत नाही. संपूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केल्यामुळे व्यवसायात वृद्धी होते. तरुणांनी कोणताही व्यवसाय छोटा अगर मोठा नसतो हे जाणून जर वाटचाल केली तर नक्कीच बेरोजगार व्हायची वेळ येणार नाही. गाव पातळीवर देखील बरेच व्यवसाय आहेत जे आपण करू शकतो, याचा शोध घेऊन वाटचाल करावी असे आवाहन ते करतात.

    भाजीपाला व्यवसायात अण्णा दौंड पाटील यांनी टेंभुर्णी परिसरात आपले स्थान निर्माण केली आहे.भाजीपाला क्षेत्रात सुद्धा करियर करता येते हे सिद्ध करून दाखवलेल्या अण्णांचा प्रवास नक्कीच उद्योग क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल.

https://mbfmaharashtra.com/listing-details?id=H1GCJnIYgWlyLLkavxKliA%3D%3D

 

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close