कुर्डूवाडी

पिग्मी एजंट ते ज्वेलर्स व्यावसायिक  जिद्द व संघर्षातून साधला यशस्वी प्रवास  अनिल आबा गवळी यांची यशोगाथा 

शिवतंत्र न्यूज

पिग्मी एजंट ते ज्वेलर्स व्यावसायिक 

जिद्द व संघर्षातून साधला यशस्वी प्रवास 

अनिल आबा गवळी यांची यशोगाथा 

शिवतंत्र न्यूज 

     प्रयत्न प्रमाणिक असले आणि यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा असली तर सर्व सामान्य घरातील व्यक्ती सुद्धा असमान्य प्रगती करू शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे कुर्डूवाडी येथील सराफ व्यवसायिक अनिल (आबा) गवळी यांनी. तब्बल 21 वर्षे प्रामाणिकपणे दैनंदिन बचत ठेव (पिग्मी) जमा करत आज त्यांनी कुर्डूवाडी परिसरात ज्वेलर्स व्यवसायात नावलौकिक मिळवला आहे.

   अनिल (आबा )गवळी यांचा हा व्यावसायिक प्रवास सुरू झाला सांगली अर्बन बँकेत पिग्मी जमा करण्यापासून. घरची परिस्थिती अतिशय सामान्य होती. मिळालेल्या या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे काम करण्यास सुरुवात केली. दुकानदारांमध्ये विश्वास निर्माण केला. पैसे जमा करणे हे अत्यंत जोखमीचे काम. मात्र त्यांनी यामध्ये एका पैशाचाही घोळ येणार नाही याची दक्षता घेतली. कुर्डूवाडी शहर व परिसरात शेकडो व्यावसायिक त्यांच्याकडे पिग्मी जमा करू लागले .यामधून बऱ्यापैकी आर्थिक फायदा त्यांना होत होता. मात्र कालांतराने याच्यासोबत आणखी एखादा व्यवसाय करता येतो का याचा शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. हॉटेल व्यवसायात त्यांनी पदार्पण केले तसेच पान मसाला व्यवसाय देखील त्यांनी सुरू केला.

 

मात्र बाबांच्या मनात काहीतरी भव्य दिव्य करण्याची मनीषा होती. त्यानुसार त्यांनी कुर्डूवाडी शहरालगत एक एकर जागा विकत घेऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग केले. प्लॉट विक्रीतून बराच आर्थिक फायदा झाला. या पैशांमधून मोठा व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 2009 मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवानी ज्वेलर्स या नावाने सोने-चांदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हे क्षेत्र गवळी परिवारासाठी नवीन होते. कसलाही अभ्यास नव्हता किंवा मार्गदर्शन करणारेही कोणी नव्हते. पिग्मी व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची ओळख एक प्रामाणिक व्यावसायिक अशी झालेली होती. लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता यातून त्यांनी हा अवघड व्यवसाय सुरू केला होता. 600 ग्राम सोने दागिन्यापासून त्यांनीही सुरुवात केली. पहिल्याच दिवशी 400 ग्रॅम सोने दागिने विकले गेले आबांना यातून खूप आनंद झाला. यातून प्रेरणा घेऊन बाबांनी प्रवास सुरू ठेवला. यानंतर आबांनी मागे वळून पाहिलेच नाही. तब्बल दोन दशके आपली प्रतिमा सांभाळून ठेवली होती. याचा फायदा त्यांना झाला. पहिल्याच दिवसापासून शिवानी ज्वेलर्सची यशस्वी वाटचाल सुरू झाली. पंढरपुर अर्बन बँकेने त्यांना 50 लाख रुपये भांडवल दिले होते. सोन्याच्या शुद्धतेनुसार बाजार भाव ,तसेच हॉलमार्क शिक्का येथील दागिन्यांवर असतो. विक्री पश्चात चांगली सेवा ग्राहकांना दिली जाते. सचोटी व प्रामाणिकपणा हा गुण आबांनी पूर्वीपासूनच जपला आहे. गुणवत्ता पूर्ण दागिने ग्राहकांना दिल्यामुळे खूप दूरवरून ग्राहक शिवानी ज्वेलर्सकडे आकर्षित झाले. करमाळा, बार्शी, भोसरे, माढा तसेच कुर्डूवाडी परिसरातील सुमारे 30 गावे, भूम , मुंबई एवढ्या दूरवरून ग्राहक नियमितपणे शिवानी ज्वेलर्स मध्ये येतात. शिवानी ज्वेलर्सला १७ वर्षे पूर्ण होत असून या प्रत्येक काळात एकही ग्राहक असा सापडणार नाही जो असे म्हणेल की आबांनी आमची फसवणूक केली. त्यामुळे असे काही ग्राहक आहेत जे 17 वर्षापासून खरेदीसाठी आम्हालाच प्राधान्य देतात असे आबा सांगतात. ग्राहकांचा एवढा प्रतिसाद मिळत आहे की दुकानात उभा राहायला जागा नसते. बाबांची दुसरी पिढी याच व्यवसायात पुढे आली आहे. चिरंजीव जयसिंग हे आता दुकानाची सर्व जबाबदारी पाहतात तर आबा त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. 

     सराफ व्यवसायातील यशानंतर आबांनी आता नवीन क्षेत्रात पदार्पण करायचे ठरवले आहे. शिवेंद्र पॅलेस व लॉन्स या नावाने गवळी परिवार हॉटेल व मंगल कार्यालय व्यवसायात उतरला आहे. या हॉटेलचे बांधकाम प्रगतीपथावर असून लवकरच ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. विविध शुभकार्यासाठी हा पॅलेस उपलब्ध असणार आहे मुख्य हॉल 115 बाय 65 फूट तर डायनिंग हॉल 55 बाय 105 एवढ्या विस्तीर्ण जागेवर या वास्तूचे बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर एसी नॉन एसी रूम देखील उपलब्ध असणार आहेत.

    आबांचे अशोक, अनिल, दत्तात्रेय असे तीन बंधू आहेत अजूनही हा सर्व परिवार एकत्रच राहतो. तब्बल 26 जणांचे एकत्र कुटुंब आहे. टेंभुर्णी रोडवरच पद्मकृपा परमिट रूम व बिअर बार तसेच कुर्डूवाडी शहरात शिवानी इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी हे व्यवसाय सुरू आहेत. व्यावसायिक क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रातही गवळी परिवार अग्रेसर आहे. कुर्डूवाडी नगरपालिका नगरसेवक व नगराध्यक्ष पदाची संधी गवळी परिवाराला मिळाली आहे. असे असली तरी गवळी परिवाराचे प्रथम प्राधान्य व्यवसाय उद्योगालाच आहे. अजूनही आबांचे पाय जमिनीवर आहेत. ग्राहकांना विनम्रसेवा देण्याचा प्रयत्न असे आबा व त्यांचे चिरंजीव जयसिंग करतात त्यामुळे सराफ व्यवसाय ते यशस्वी झाले आहेत . जिद्द चिकाटी व संघर्षाच्या जोरावरती वाटचाली यशस्वी झाल्याचे अनिल आबा सांगतात. युवा वर्गाने कोणत्याही व्यवसायाची लाज न बाळगता झोकुन द्यावे असेही ते आवाहन करतात.

   एका पिग्मी व्यवसायाच्या रूपाने सुरू झालेला हा व्यवसाय एक विशाल वटवृक्षात रुपांतरीत होत आहे. व्यवसायाची सुरुवात करा उद्याचे भविष्य नक्कीच उज्वल असेल हा धडा या निमित्ताने सर्व बांधवांना आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close