माढा

मित्रांच्या मदतीने उभारला उद्योग  अपार संघर्षातून महेश गुंड यांना मिळाली आर ओ फिल्टर व्यवसायातून नवीन ओळख 

शिवतंत्र न्यूज

मित्रांच्या मदतीने उभारला उद्योग 

अपार संघर्षातून महेश गुंड यांना मिळाली आर ओ फिल्टर व्यवसायातून नवीन ओळख 

 

शिवतंत्र न्यूज 

 

     मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…. हे गाणे सर्वांच्याच ओठावर आहे. मैत्रीची थोरवी यामध्ये वर्णन केली आहे. माढा जिल्हा सोलापूर येथे मित्रत्वाची एक न्यारी गाथा पाहण्यास मिळाली आहे. एका बेरोजगार मित्राला काही मित्रांनी एकत्र येत आर ओ फिल्टर उद्योग उभारण्यास मदत केली. यातून उभारी घेत या मित्राने उंच झेप घेतली आहे. संपूर्ण माढा शहराच्या घराघरात ती व्यक्ती पोहोचली आहे. प्रियदर्शनी अमृत जल च्या माध्यमातून महेश रामचंद्र गुंड यांनी गरुड झेप घेतली आहे.  

 

महेश हे मूळचे बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांच्याकडे पूर्वी महिंद्रा कमांडर ही गाडी होती. या माध्यमातून ते प्रवासी वाहतूक व्यवसाय करत होते. सुमारे दहा वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला. काही कारणांमुळे ही गाडी त्यांना विकावी लागली. उत्पन्नाचा कोणताही स्रोत त्यांच्याकडे उरला नाही. या दहा वर्षाच्या कालावधीत त्यांना बराच मित्रपरिवार मिळाला होता. बरेच प्रयत्न करूनही महेश गुंड यांना उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण करता आला नाही. महेश घोलप, प्रभाकर जाधव, आजिनाथ राऊत (माळी), रुपेश मुळे या चार मित्रांनी एकत्रित त्यांना एखादा व्यवसाय उभा करून देण्याचा निर्णय घेतला. बरीच शोधाशोध केल्यानंतर फिल्टर व्यवसाय बद्दल एकमत झाले. शेड उभारणीपासून ते मशिनरी पर्यंत प्रत्येकाने एक एक वस्तू या मित्रमंडळींनी जमा केली. आणि प्रियदर्शनी अमृत जल या उद्योगाची पायाभरणी झाली. पन्नास जार चा संच उभारला गेला. मित्रमंडळींच्या सहकार्यातून खूप मोठी मदत महेश यांना झाली होती. या संधीचे सोने करण्याची खूणगाठ त्यांनी बांधली होती. त्यांच्याकडे एक मोटरसायकल होती. याच्या साह्याने त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला. घरोघरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी ते या मोटार सायकलच्या माध्यमातून जार पोहोच करत होते. लग्न समारंभात देखील ते जार वेळेवर पोहोच करत असत. अतिशय उच्च गुणवत्तेचे व थंड पाणी ते ग्राहकांना देत होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये त्यांची एक नवी ओळख निर्माण झाली. व्यवसायाची गरज म्हणून थोडे भांडवल निर्माण होतात त्यांनी आणखी 50 जार खरेदी केले. शंभर जारच्या साह्याने त्यांनी व्यवसायास गती दिली. विविध सण , समारंभ, लग्न सोहळे या ठिकाणी ते जार पोहोच करत होते. एकाच वेळी तीन तीन ठिकाणी ते पाणीपुरवठा करत. 100 जार असताना ते एका दिवशी तब्बल 300 जार आळीपाळीने ग्राहकांना देत होते. जगदाळे मंगल कार्यालयाचे भिवाजी जगदाळे यांचे त्यांना अनमोल असे सहकार्य लाभले. प्रत्येक लग्न सोहळ्याचे पाणीपुरवठ्याचे काम त्यांनी महेश यांना दिले. तसेच अण्णा कवठे, संदीप आरे , विशाल घोगरे यांचे देखील महत्त्वाचे सहकार्य त्यांना मिळाले. अशातच कोरोनाचे संकट ओढवले. लग्न सोहळे, विविध सणसमारंभावर गदा आली. व्यवसाय थांबला गेला सुमारे चार लाख 50 हजार रुपये मित्रमंडळीचे देणे बाकी होते व्यवसाय थोड्याफार प्रमाणावर चालू होता. त्यांनी माढा येथील सन्मति पतसंस्थेमधून पाच लाखाचे कर्ज घेतले . त्यातील साडेचार लाख रुपये मित्रांचे उसने दिलेले माघारी दिले. त्यांनी टाटा जीप साठी उरलेले 50 हजार भरले व नवीन जीप व्यवसायासाठी खरेदी केली. या वाहनांमध्ये एका वेळी पन्नास जार बसत होते. घरोघरी पाणीपुरवठा याच्या साह्याने त्यांनी सुरू केला. या सर्व कामकाजात महेश यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या त्यांच्या पत्नी सौ ऍड दिपाली. दिपाली या वकील आहेत मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता सर्व जार त्या स्वतः धुण्याचे काम करत. तसेच महेश यांना या कामात त्यांनी खांद्याला खांदा लावून मदत केली. महेश यांनी ग्राहकांना सुद्धा पाणी भरण्याच्या अगोदर जार धुण्याची सवय लावली. लग्नावेळी सौ दिपाली या बीए च्या दुसऱ्या वर्षाला होत्या. त्यानंतर त्यांनी बीए पूर्ण करून बीसीए व नंतर एलएलबी शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षित असतानाही महेश यांच्या पडत्या काळात त्यांनी त्यांना साथ दिली. नवीन गाडीमुळे कोरोना काळातही जार सेवा अधिक सुलभतेने देता येत असल्यामुळे त्यांच्या व्यवसायात वाढ झाली. महेश यांनी कामगार न लावता सर्व कामे स्वतः केली. टाटा जीपमध्ये एका वेळी फक्त 50 जार बसत होते. मागणी वाढू लागल्यानंतर त्यांनी अशोक लेलँड कंपनीचा दोन हजार लिटर क्षमतेचा एक टँकर विकत घेतला. महेश यांची सेवा व गुणवत्ता अतिशय दर्जेदार असल्याने दिवसेंदिवस फिल्टर पाण्यासाठी त्यांनाच प्रथम प्राधान्य मिळत होते. मागणी वाढत चालल्याने त्यावेळी आणखी दोन टँकर खरेदी केले. तसेच टाटा कंपनीच्या दोन जीप विकत घेतल्या. सुरुवातीला एक हजार लिटर साठवन क्षमतेची पाण्याची टाकी होती. आता त्यांच्याकडे 12000 लिटर साठवन क्षमता आहे. फिल्टर व्यवसाय करत असताना शुभ कार्यप्रसंगी द्रोण, पत्रावळी, पाणी ग्लास, चहा ग्लास, छोट्या डिश यांची मागणी देखील होऊ लागली. या वस्तू देखील त्यांच्याकडे उपलब्ध असतात. नुकतेच त्यांनी इव्हेंट क्षेत्रात पदार्पण केले आहे. विविध लोकप्रिय पात्रांच्या पोशाखात जसे की गोरिला, तात्या विंचू, भूत, पांडा अशा लोकप्रिय पात्रांच्या पोशाखात लोकांचे मनोरंजन करण्याचे काम ते करत आहेत. 

     एकेकाळी डिप्रेशन मध्ये गेलेले महेश नाना आता यश शिखरावर आहेत. त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देत आहेत. मुलगा एमए करत असून मुलगी बी फार्मसी करत आहे. पाच कामगारांना त्यांच्या माध्यमातून रोजगार मिळाला. नवोदित व्यावसायिक व उद्योजकांना ते आवाहन करतात की निवडलेल्या क्षेत्रात समर्पण भावनेने काम करा. आजचे काम आजच करा. कष्ट करण्याची तयारी ठेवा, विशेष म्हणजे मित्र कमवा. कामामध्ये जिद्द चिकाटी व सातत्य ठेवा. 

   महेश नाना गुंड यांचा हा जीवन प्रवास नक्कीच नवोदित उद्योजक व्यवसायिकांना प्रेरणा देईल.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close