कुर्डूवाडी
मधुर मिल्क च्या माध्यमातून कुर्डूवाडी परिसरात घडली धवलक्रांती कुर्डूच्या रामलिंग गाडेंनी शेकडो युवकांना दिली उद्योजकतेची गुरुकिल्ली
शिवतंत्र न्यूज

मधुर मिल्क च्या माध्यमातून कुर्डूवाडी परिसरात घडली धवलक्रांती
कुर्डूच्या रामलिंग गाडेंनी शेकडो युवकांना दिली उद्योजकतेची गुरुकिल्ली
शिवतंत्र न्यूज

ग्रामीण भागातील अर्थकारण सर्वसाधारणपणे दूध व्यवसायावर चालते. पूर्वी जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून दूध संकलन होत होते. काळाच्या ओघात बहुतेक सहकारी संस्था शेवटची घटका मोजत आहेत. कुर्डू तालुका माढा येथील रामलिंग गाडे यांनी अशा काळात दूध उत्पादक व व्यवसायिकांना आधार देत मधुर मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट च्या माध्यमातून शेकडो शेतकरी तरुणांना डेअरी उद्योगात आणून स्वबळावर उभे केले आहे. मधुर दूध उत्पादक संस्था ही आजमीतिला माढा तालुक्यातील एक नामांकित संस्था म्हणून उदयास आली आहे. 50 लिटर पासून सुरू झालेला हा प्रवास तीस हजार लिटर प्रतिदिन संकलनापर्यंत पोहोचला आहे.

रामलिंग गाडे यांचा पूर्वीपासून दूध व्यवसाय होता. सुरुवातीला 50 लिटर दूध उत्पादन स्वतःच्या घरातील ते घेत होते. रामलिंग यांच्या मनात दूध डेअरी सुरू करण्याची संकल्पना निर्माण झाली. 2013 मध्ये त्यांनी मधुर मिल्क ची स्थापना करत दूध संकलन केंद्राची स्थापना केली. सुरुवातीला फक्त त्यांचेच दोनशे लिटर दूध संकलन होत होते . परिसरातील काही मोठ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी मधुर मिल्कचा प्रवास सुरू केला. बघता बघता संकलन 1000 ते 1200 लिटर होऊ लागले. सोलापूर जिल्हा दूध संघाकडे ते दूध देऊ लागले.
मधुर परिवारात दिवसेंदिवस दूध उत्पादक शेतकऱ्यांची वाढ होऊ लागली. गाडे यांच्या नातेवाईक तसेच मित्र परिवारामध्ये अनेक तरुण बेरोजगार होते. त्यांना गाडे यांनी डेअरी व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा दिली. तरुणांचे जीवन गाडे यांच्यामुळे बदलले. सर्वसामान्य तरुण उद्योजक व्यावसायिक निर्माण झाले. गावागावातून हजारो लिटर दूध संकलन होऊ लागले. गाडे यांनी या सर्व तरुणांना भांडवल, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही दिले. कुर्डूवाडी परिसरातील चार हजार दूध उत्पादक मधुर परिवाराशी जोडले गेले आहेत. रामलिंग गाडे यांनी उत्पादकांना गाई खरेदीसाठी पतपुरवठा करता यावा याच्यासाठी संत सावतामाळी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून आजवर शेकडो शेतकऱ्यांनी गाई म्हशी खरेदी केल्या तसेच माढा तालुक्यातून 80 युवकांना उद्योजक बनवण्याचे काम गाडे यांनी केले. 80 छोटे-मोठे संकलन केंद्राच्या माध्यमातून जवळपास 30000 लिटर दूध संकलन मधुर मिल्क कडे येत आहे. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देता यावा यासाठी गाडे यांनी दूध प्रक्रिया युनिट देखील सुरू केले. याच्या माध्यमातून पनीर, दही, क्रीम, स्कीम मिल्क , कंडेन्स मिल्क आदी पदार्थ तयार केले जातात. उत्पादित पदार्थ, दूध यांना हैदराबाद , तामिळनाडू आदी भागांमध्ये भरपूर मागणी आहे. मधुर मिल्क परिवारामध्ये 35 कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रामलिंग गाडे यांनी नेहमीच दूध उत्पादकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वेळी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन उत्पादकांना चारा उपलब्ध करून दिला. या परिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे पशुखाद्य, भुसा, शेंगदाणा पेंड, सरकी वाजवी तरात उपलब्ध करून दिले जाते.





