माढा

घाडगे परिवाराचे हॉटेल व्यवसायात तीन पिढ्यांचे योगदान 79 व्या वर्षात केले यशस्वी पदार्पण हॉटेल शिवांजलीच्या सचिन घाडगे यांची नाबाद 34 वर्षांची कामगिरी

शिवतंत्र न्यूज

घाडगे परिवाराचे हॉटेल व्यवसायात तीन पिढ्यांचे योगदान

79 व्या वर्षात केले यशस्वी पदार्पण

हॉटेल शिवांजलीच्या सचिन घाडगे यांची नाबाद 34 वर्षांची कामगिरी

शिवतंत्र न्यूज 

 

      हॉटेल क्षेत्रामध्ये मराठा बहुजन समाज पूर्वी अभावानेच दिसत असायचा. एवढ्यात बऱ्याच प्रमाणात या क्षेत्रात युवावर्ग येताना दिसत आहे. माढा जिल्हा सोलापूर येथील घाडगे परिवाराने तब्बल 79 वर्षे हॉटेल क्षेत्रात यशस्वीपणे काम केले आहे. माढा बस बसस्थानका समोर सध्या असलेले हॉटेल शिवांजली या व्यवसायाने चक्क 34 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे. तब्बल तीन पिढ्या या व्यवसायात कार्यरत आहेत. सचिन अरुण घाडगे हे या व्यवसायिकाचे नाव असून त्यांचा हा प्रवासा अतिशय प्रेरणादायी आहे.

     सचिन यांचे आजोबा कृष्णा घाडगे यांनी 1947 मध्ये स्वतःच्या जागेत हॉटेल सुरू केले होते. चहा, नाश्ता, जेवण येथे मिळत असायचे. विविध शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून नागरीक माढ्यामध्ये यायचे. या नागरिकांना घरगुती पद्धतीच्या खानावळीची सोय कृष्णा घाडगे यांनी केली होती. 1976 मध्ये अरुण घाडगे यांच्याकडे हॉटेल व्यवसायाची जबाबदारी आली. अरुण यांनी ही जबाबदारी सार्थपणे पार पाडली. त्यांना सचिन, नितीन, प्रवीण, प्रमोद अशी चार मुले आहेत. या चारही मुलांना त्यांनी व्यवसायाचे बाळकडू दिले. तेही आपापल्या व्यवसायात यशस्वी आहेत. सचिन , नितीन हे व्यवसायात आहेत तर प्रवीण हे शिक्षक आहेत. प्रमोद हे पोलिस दलात आहेत.


   1992 मध्ये सचिन यांच्यावर हॉटेल शिवांजली ची जबाबदारी आली. बस स्थानकासमोर हे हॉटेल असल्यामुळे येथे कायम वर्दळ असते. सचिन यांनी चहा, कॉफी, नाश्ता बरोबरच विविध प्रकारचे बेकरी पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, जिलेबी, मिठाई, पेढे आदी पदार्थ उपलब्ध केल्यामुळे ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. सचिन हे ग्राहकांशी नेहमीच आपुलकीने बोलतात. त्यांना उत्कृष्ट सेवा देतात. त्यामुळे वर्षानुवर्षी ग्राहक येथे नियमितपणे येतात. बस स्थानकासमोर सोलापूर रोड येथे हा व्यवसाय स्थिरावल्यानंतर त्यांनी याच रोडवरील छत्रपती शिवाजीनगर येथे शिवांजली कोल्ड्रिंक्स मस्तानी हाऊस या नावाने नवीन शाखा शुभारंभ 19 फेब्रुवारी 2018 रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपल्या आई-वडिलांच्या शुभहस्ते सुरुवात केली. इथे विविध प्रकारचे कोल्ड्रिंक्स विविध प्रकारच्या मस्तानी, विविध प्रकारच्या आईस्क्रीम तसेच बेकरी पदार्थ मिळतात. महाविद्यालय जवळ असल्याने तरुण वर्ग मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतो. येथील फालुदा, मिल्कशेक, मस्तानी विशेष प्रसिद्ध आहेत. सचिन यांच्या सौभाग्यवती सौ मधुमती या येथील युनिटची जबाबदारी सांभाळतात. दोन्ही ठिकाणी चार कामगार कार्यरत आहेत. सचिन यांना दोन मुले व एक मुलगी आहे. एक मुलगा बीएएमएस डॉक्टर असून ते बेळगाव येथे आरोग्य सेवा देतात. मुलगी CA करते तर दुसरा मुलगा प्रज्वल हा हॉटेल मॅनेजमेंट करत आहे. प्रज्वल हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हॉटेल क्षेत्रातच काम करणार आहे. व्यवसाय करत असताना ते सामाजिक क्षेत्रात देखील काम करतात. रोटरी क्लबच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात. 2021 -22 मध्ये ते रोटरी क्लबचे माढा अध्यक्ष देखील होते. व्यवसायाची जबाबदारी सांभाळून अध्यक्षपदाच्या कालावधीत 100 प्रकल्पावर त्यांनी यशस्वीपणे काम केले.


     34 वर्ष एवढ्या प्रदीर्घ काळ यशस्वीपणे हॉटेल व्यवसाय चालवला याचे रहस्य सांगताना ते म्हणतात की, व्यवसाय करताना तोंडात साखर व डोक्यावर बर्फ असला पाहिजे. ग्राहकांना उत्तम सेवा दिली तसेच उत्तम संभाषण कौशल्य जिद्द चिकाटी व सातत्य या गोष्टींचा अवलंब केल्यामुळेच मी या क्षेत्रात टिकू शकलो. नव्या पिढीला आवाहन करताना ते म्हणतात की व्यवसाय सुरू केल्यानंतर काही काळ आपण वाट पाहिली पाहिजे. व्यवसाय चालला तर नाराज नाही झाले पाहिजे. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यानुसार व्यवसायाची निवड केली आणि ग्राहकांशी उत्तम संबंध ठेवले तसेच दर्जेदार सेवा पुरवली तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो.

     तीन पिढ्या यशस्वी व्यवसाय केलेल्या सचिन घाडगे यांची ही यशोगाथा नक्कीच युवकांसमोर एक आदर्श आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close