
कमी कार्बचा आहार आणि कोलेस्टेरॉल नियंत्रण
शिवतंत्र न्यूज
डॉ. अविनाश भोंडवे
उत्तम आरोग्यासाठी समतोल आहार आवश्यक असतो. आहारातल्या अन्नघटकांमध्ये स्निग्ध पदार्थ (फॅट्स), प्रथिनं (प्रोटीन) याबरोबर पिष्टमय पदार्थ म्हणजे ‘कर्बोदके’ (कार्ब्ज) आहारातले मुख्य घटक असतात.
‘कार्ब्ज’मुळे शरीरात ऊर्जा निर्माण केली जाते; तसंच ती साठवलीदेखील जाते. शरीरातले डीएनए आणि ‘आरएनए’मधले ‘रायबोज’ आणि ‘डी-ऑक्सिरायबोज’ या शर्करा ‘कार्ब्ज’चंच रूप असतात. शरीरातले ऊर्जावहन करणारे एटीपी निर्माण करण्यातही कार्ब्जचा समावेश असतो. वजन कमी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सल्ल्यांमध्ये आहारातले कमी गोड; म्हणजे कार्ब्ज आणि तैलयुक्त पदार्थ कमी करायला सांगितलं जातं.

नवीन संशोधन
कमी-कर्बोदकयुक्त आहार घेतल्यानं शरीरातील कोलेस्टेरॉलची; त्यातही विशेषकरून ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन’ची (एलडीएल) रक्तातील पातळी वाढते, परिणामी हृदयविकार होण्याची शक्यता वाढते, असं सांगणारं नवं संशोधन समोर आलं आहे. त्याविषयी…
‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’मधल्या अलेक्सा बराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलं.
कमी कार्बोहायड्रेट डाएटची लोकप्रियता वाढू लागल्यानंतर या डाएटमुळे ‘एलडीएल’च्या पातळीत वाढ का होते आणि अशी वाढ सगळ्यांच्या बाबतीत होते का, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं.
या संशोधनात दिसून आलं, की आहारातले कार्ब्ज कमी केल्यावर ‘एलडीएल’च्या पातळीतली वाढ त्या व्यक्तीच्या जनुकांवर अवलंबून असते.
हे संशोधन ‘डाएटफिट्स’ या २०१६मध्ये झालेल्या व्यापक संशोधनातल्या माहितीवर आधारित आहे. या ‘रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल’मध्ये सहाशेहून अधिक प्रौढ व्यक्ती सहभागी झाल्या. त्यातल्या निम्म्या जणांना कमी कार्ब असलेला निरोगी आहार देण्यात आला, तर उरलेल्या सहभागी व्यक्तींना पूर्ण एक वर्ष कमी कार्बोहायड्रेट्सचा आहार देण्यात आला.
उपलब्ध जनुकीय माहितीची नोंद असलेल्या ४३१ सहभागींचा जनुकीय प्रकार (जीनोटाइप), सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण, आहाराचा प्रकार आणि सुरुवातीपासून ते सहा महिन्यांपर्यंत ‘एलडीएल’ बदल यांच्यातल्या परस्पर संबंधांचं मूल्यांकन केलं.


