माढा

यशोगाथा : दीपक जगताप विमा व्यावसायिकाची गगन भरारी!

शिव तंत्र न्यूज

यशोगाथा : दीपक जगताप

विमा व्यावसायिकाची गगन भरारी!

 

शिवतंत्र न्यूज 

     लहानपणी मिळेल ते काम केले. अगदी शेतात मजुरीपासून ट्रॅक्टरमध्ये मुरुम भरला. डोक्यावर वाळू वाहिली. अभ्यासातील प्रगती जेमतेम असल्याने मोठी नोकरी लागण्याची शक्यता नव्हती. म्हणून पिग्मी एजंट म्हणून कामाला सुरुवात केली. याच काळात एलआयसीच्या पॉलिसी विकण्याचे काम सुरू केले. आयआरडीएची परीक्षा पास केली. अत्यंत कठीण असा एमडीआरटी किताब मिळवून अमेरिकेत जागतिक संमेलनाला जाण्याची संधी मिळाली. दीपक जगताप यांचा हा प्रवास केवळ आव्हानात्मकच नव्हे तर इतरांसाठी प्रेरणादायीही आहे.

– डॉ. उमेश कणाकवलीकर

       दिनांक २५.०२.२०२० रोजी हॉटेल शेराटॉन ग्रँड, पुणे या पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय जीवन विमा निगमातर्फे टी.ओ.टी., सी.ओ.टी., एम.डी.आर.टी. २०२० संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी श्री. दीपक कमल महादेव जगताप या ३८ वर्षीय ग्रामीण युवकाचा सत्कार करण्यात आला. दीपक यांनी एम.डी.आर.टी., यू.एस.ए. हा किताब सलग १२ व्या वर्षी जिंकला आहे. या सत्कार सोहळ्याचा फोटो दीपक यांनी मला व्हॉट्सॲपवर पाठवला. मी त्यांचे लगेच अभिनंदन केले. तेव्हा त्यांनी मला दिलेल्या प्रतिक्रियेत, “सर, आपल्यामुळे हे शक्य झाले. आज मला वाटते की, जर तुम्ही माझ्या जीवनात आला नसता तर मी हे दिवस पाहिले नसते. तुम्ही मला जो आत्मविश्वास आणि प्रेरणा दिली, त्यामुळेच हे शक्य झाले. धन्यवाद!” हे शब्द वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मला दिनांक २२.१०.२००७ चा दिवस आठवला.

     या दिवशी हॉटेल सेंच्युरियन, पुणे येथे एल.आय.सी. तर्फे ‘मी विजेता होणार!’ ‘आर्ट ऑफ विनिंग’ हे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात इन्शुरन्स सेक्टरमधील एम.डी.आर.टी. या किताबासाठी पात्र होतील, असे संभाव्य विमा प्रतिनिधी आमंत्रित केले होते. प्रशिक्षणादरम्यान मी एका विमा प्रतिनिधीला फटकारले होते. कारण त्याच्या पायात बूट नव्हते, तो साधी चप्पल घालून आला होता. तसेच त्याने शर्टदेखील इन केलेला नव्हता. ‘एल.आय.सी. सारख्या कॉर्पोरेट संस्थेचे तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या या मूलभूत गोष्टींचं तुला भान नाही? जा, शर्ट इन कर आणि उद्यापासून बूट घालून काम सुरू कर. आपले ग्राहक सर्वप्रथम आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहतात आणि त्यानंतर ते एल.आय.सी.कडे पाहतात. म्हणून प्रथमदर्शनी आपली लोकांवरील छाप ही चांगली पडली पाहिजे,’ हा शुद्ध हेतू मी उपस्थितांना समजावून सांगितला. तोच हा विमा प्रतिनिधी.  श्री. दीपक जगताप. त्यावेळेस तो फक्त २३ वर्षांचा तरुण होता. एम.डी.आर.टी. हा किताब पटकावणे हे खूप कठीण काम आहे. हजारो विमा प्रतिनिधींमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके या किताबाला पात्र ठरतात. त्यांना कंपनीतर्फे अमेरिकेला जागतिक संमेलनासाठी सन्मानाने पाठवण्यात येते.  

   दीपक यांनी मला त्यावेळेस त्यांची कथा आणि व्यथा सांगितली होती. पण आज त्याच व्यथेवर मात करत त्यांनी स्वतःची यशोगाथा निर्माण केली. ३१.०३.१९८४ रोजी उपळाई खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर या छोट्याशा खेड्यात दीपक यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील शेतमजुरी करायचे. थोरला भाऊ प्रदीप हा अभ्यासात हुशार होता, पण मोठी बहीण मीरा आणि दीपक हे दोघेही अभ्यासात जेमतेम होते. दीपक यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण आणि रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षण घेतले. दहावीला ३७ टक्के, तर बारावीला ४३ टक्के गुण मिळवून कसाबसा शिक्षण घेतले. गरिबी जन्मतःच नशिबाला आली होती. त्यामुळे अगदी लहान वयात ट्रॅक्टरने मुरूम भरणे, डोक्यावरून वाळू वाहणे, लोकांच्या शेतात काम करणे, वीटभट्टीमध्ये काम करणे असे दररोज सात ते आठ तास काम केल्यावर तीस ते चाळीस रुपये रोजगार मिळायचा. त्यातून पैसे जमा करून एक सायकल विकत घेतली होती. कारण गावापासून कॉलेज लांब होते. दररोज येऊन-जाऊन बारा किलोमीटर प्रवास करावा लागायचा आणि त्यासाठी एसटीचे पैसे नव्हते. रोजचे काबाडकष्ट आणि सायकलचा प्रवास यामुळे आपोआपच व्यायाम व्हायचा. त्यामुळे शरीरयष्टी सुदृढ झाली होती आणि त्यांना कष्टाची जणू सवयच लागली होती.

    दीपक यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान सांगितले, “माझा थोरला भाऊ प्रदीप पदवीधर झाला आणि एम.ए. करण्यासाठी तो कोल्हापूर विद्यापीठात रुजू झाला. पण त्याचा दरमहा ३००० रुपये खर्च होता. मी अभ्यासात हुशार नसल्यामुळे आपल्या वडील बंधुला तरी चांगले शिकू दे, या उद्योगाने मी मोलमजुरी करून भावाच्या शिक्षण खर्चाला हातभार लावू लागलो. मोठी बहीण मीरा हिच्या शिक्षणासाठी तिच्या लग्नासाठी पैसा जमवण्यासाठी आमच्या दिरंगाईची वाट पाहत तीन एकर शेती दीड लाखाला विकावी लागली. मी शिक्षणाऐवजी रोजंदारीचा मार्ग अवलंबला. कारण आई-वडिलांना हलक्या हाताचा आणि काबाडकष्टाचा मुळा पाहत नव्हते. मी संत राहून पतसंस्थेचे शिपाई म्हणून काम सुरू केले. मी, माझी सायकल आणि माझे ग्राहक असा हा जीवन प्रवास सुरू झाला होता. काळाच्या ओघात ही पतसंस्था आता बंद झाली, पण माझ्या जीवनात या पतसंस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. २००२ साली मी एल.आय.सी. चे काम सुरू केले. त्या काळात श्री. अजित अनगळे यांनी मला सहकार्य केले.

    मला एल.आय.सी. तर्फे बावीस दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. पण त्या प्रशिक्षणासाठी मला दररोज जाऊन-येऊन १२० किलोमीटरचा एसटी प्रवास करावा लागत होता. आता काळ बदलला आहे. आता हे प्रशिक्षण ऑनलाइन दिले जाते. त्यानंतर मी इन्शुरन्स संस्थेमध्ये आयोजित आय.आर.डी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालो. ती परीक्षा माझ्यासाठी सोपी नव्हती. मी विमा प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले. मी एक ग्रामीण युवक असल्यामुळे माझ्या कुठे ओळखी नव्हत्या, कस्टमर अनुभव नव्हता. माझी शिकण्यास सुरुवातीची कोणतीही नव्हती. पण मला दुसरा काही पर्याय सूचत नव्हता. ज्या पतसंस्थेच्या ग्राहकांकडे मी पिग्मी कलेक्शनसाठी जायचो, त्यांच्यापासून मी विम्याचे महत्व सांगू लागलो. त्यावेळेस त्या लोकांनी माझ्याकडे कष्टपूर्वकपणे मला हातभार लावला म्हणून माझ्याकडून छोटे-छोटे विमे उतरवले. पाहता पाहता माझा कामाचा जम बसू लागला. पहिल्याच वर्षी मी सात हजार रुपयांची कमिशन कमावले. मला या कामात आवड निर्माण झाली आणि बऱ्यापैकी उत्पन्न झाल्यामुळे कामाचा हुरूप आला. मी ठरवले की, आता पूर्वीच एल.आय.सी.चेच काम करायचे. मला याच भूमीचे मोल आहे. मी माझ्या ज्ञानातील शिक्षकांना आमच्या कुर्डूवाडीतील पहिली मोटरसायकल कर्ज काढून विकत घेतली. मोटरसायकलने मी चार वर्षांत दोन लाख किलोमीटरचा प्रवास केला. या वाहनाने मला सर्व साध्य दिली.

    माझे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री. मोहन कदम यांनी मला वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले. आज श्री. मोहन कदम आमचे असिस्टंट ब्रँच मॅनेजर आहेत. त्यांनीच मला विमा क्षेत्रातील मिलियन डॉलर राऊंड टेबल म्हणजे एम.डी.आर.टी. या किताबाची माहिती आणि महत्त्व पटवून दिले. एम.डी.आर.टी. केल्यानंतर मोठे उत्पन्न मिळते, तसेच परदेशात जाता येते, टेलिफोनचे बिल मिळते, फोर व्हीलरसाठी आणि घरासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळते. या सर्व गोष्टींमुळे मी एम.डी.आर.टी. या किताबाकडे आकर्षित झालो. माझे दुसऱ्या वर्षाचे उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये म्हणजे दुपटीने वाढले. तिसऱ्या वर्षी ते एक लाख ऐंशी हजार झाले, चौथ्या वर्षी दोन लाख चाळीस हजार, तर पाचव्या वर्षी ते चार लाखांपर्यंत पोहोचले. २००७ मध्ये मला एल.आय.सी.तर्फे एम.डी.आर.टी. कसे व्हायचे याचे प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणादरम्यान डॉ. उमेश कणकवलीकर यांच्या मार्गदर्शनामुळे मीही एम.डी.आर.टी. हा किताब पटकावू शकतो, असा आत्मविश्वास जागृत झाला. त्यानंतर मी २००८ मध्ये त्यांचे ‘आर्ट ऑफ विनिंग’ हे दिवसभराचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टडी मटेरियल म्हणून देण्यात आलेल्या सदर पुस्तकाचा मला फायदा झाला. मी एम.डी.आर.टी. होणारच! हे पुस्तक माझ्यासाठी अनमोल मार्गदर्शक ठरले. त्यामुळे माझा एम.डी.आर.टी.चा मार्ग सुलभ आणि सुखकर झाला.

    माझे थोरले बंधू प्रदीप हे आता पुण्यात राहून एमपीएससीचा अभ्यास करू लागले. तीन हजार रुपयांचा खर्च आता दहा हजारांवर पोहोचला होता. मी माझ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो. त्याला एवढेच म्हटले होते की, जे मला जमले नाही ते तू करून दाखव. तो कोल्हापूर विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उच्च पदवीधर झाला. आपल्या कष्टाचे चीज होत आहे, असे मला वाटले.

  एम.डी.आर.टी.चे कालचक्र हे जानेवारी ते डिसेंबर असे असते. माझे प्रशिक्षण ऑक्टोबर २००९ ला झाले होते आणि केवळ ७० दिवसांत मला अंदाजे दहा लाख रुपयांचा प्रीमियम मिळवायचा होता. ज्या दिवशी माझी डॉ. उमेश कणकवलीकर सरांची प्रशिक्षणादरम्यान पहिली भेट झाली त्या रात्री मी झोपलो नाही. कारण सर म्हणाले होते, ‘आपण रोजच झोपतो. आज झोपू नका, तर जागरण करा. आपल्या स्वप्नांसाठी पेटून उठा. आज जर झोपलात तर महिनाभराचे कष्ट फुकट जातील.’

   एम.डी.आर.टी. हे आव्हान स्वीकारा. टाळाटाळ करू नका, तर त्याला सामोरे जा. खूप जास्त लोकांपर्यंत जाऊ नका, तर तुमच्या जिद्दीचे बळ वाढवा. जास्तीत जास्त लोकांना तुमच्या विषयाचे महत्त्व कसे पटवून देऊ शकाल, कोणत्या ग्राहकाला तुम्हाला भेटावे लागेल, याची योजना आजच आखा. एम.डी.आर.टी.चे स्वप्न पाहा. आता जर श्रम घ्याल, तरच तुम्हाला एम.डी.आर.टी. किताबाचे सुख प्राप्त होईल. स्वप्नं ती नसतात, जी माणसाला झोपू देतात. स्वप्नं ती असतात, जी माणसाला झोपून ध्यायला प्रवृत्त करतात.

  ‘उठा, जागे व्हा आणि आपले एम.डी.आर.टी. झाल्याशिवाय थांबू नका.’ त्या रात्री मी माझ्या थोरल्या बंधूबरोबर बसून चर्चा केली. योजना आखली आणि मी एम.डी.आर.टी. होणारच! या तीन शब्दांवर शिक्कामोर्तब केले.

   मी उर्वरित प्रत्येक दिवसाचे नियोजन केले. मी ठरवले की प्रत्येक दिवशी टार्गेट ठरवलेली विमा रक्कम जमा झाली तरच मी त्या दिवशी जेवणार, नाहीतर मी उपाशी झोपणार. त्या सत्तर दिवसांत मला काही दिवस उपाशीही झोपावे लागले, पण मी माझ्या स्वप्नांसाठी पेटून उठलो होतो. मी पहाटे पाचला उठायचो आणि सहाला घर सोडायचो. आमच्या सोलापूरतील जवळपासच्या तालुक्यातील ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटीसाठी धावायचो. त्यांना विम्याचे महत्त्व तर सांगायचोच, पण मी माझ्या एम.डी.आर.टी.च्या ध्येयाविषयीही सांगायचो. माझी कळकळ, तळमळ पाहून माझ्या ग्राहकांनी मला विमा उतरवून खूप मदत केली. माझे डेव्हलपमेंट ऑफिसर, ब्रँच मॅनेजर हे सुद्धा कधी कधी माझ्यासोबत ग्राहकांच्या भेटीला यायचे. सर्वांच्या सहकार्यामुळे वयाच्या २४ व्या वर्षी मी आयुष्यात पहिल्यांदा एम.डी.आर.टी. झालो आणि सर्वात कमी वयात एम.डी.आर.टी. करणारा म्हणून विजेता ठरलो. त्यानिमित्ताने माझा सत्कार सोहळाही आयोजित केला होता. ज्याप्रमाणे लहान मुलांना पोलिओचा डोस दिला जातो, त्याप्रमाणे ‘मी विजेता होणारच!’ ‘आर्ट ऑफ विनिंग’ माझ्यासाठी एक कायमस्वरूपी डोस ठरला आहे. मी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

   मी सतत बारा वर्षे एम.डी.आर.टी. हा किताब पटकावत आहे. यावर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२० पर्यंत मी एम.डी.आर.टी.चा पुढील किताब, सी.ओ.टी. अर्थात सेंटर ऑफ टेबल हा किताब पटकावण्यासाठी प्रयत्नशील झालो आहे. मार्च २०२० पर्यंत मी माझे तेरावे एम.डी.आर.टी. पूर्ण करून उर्वरित सात महिन्यांत मी सी.ओ.टी.साठी प्रयत्न करणार आहे. डॉ. उमेश कणकवलीकर सर मला नेहमी म्हणतात की, दरवर्षी एम.डी.आर.टी. करून तू एकाच इयत्तेत पुन्हा पुन्हा पास होत आहेस. आता पुढची परीक्षा पास कर. एम.डी.आर.टी. करणे कठीण आहे तर सी.ओ.टी. कर्मकठीण आहे, पण कठीण जरी असले तरी ते अशक्य नाही. यावर्षी एक कोटी रुपयांचा प्रीमियम कनेक्ट करून मी सी.ओ.टी. करणारच!  

   आज मला एलआयसीतर्फे प्रशिक्षण देण्यासाठी बोलावले जाते. माझे सतत सत्कार होतात. या सर्वांमुळे एक नवीन प्रेरणा मिळते. उपळाईमध्ये आमच्या कुटुंबाचे सामूहिक घर आहे. मी पत्र्याच्या घरात राहायचो, पण मी स्वप्न पाहायचो, की एक दिवस माझे माढा या तालुक्याच्या ठिकाणी आणि सोलापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःचे घर असेल. आज आमच्या गावातील लोक माझी प्रशंसा करतात. कारण मी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करत माढा येथे ‘जीवनदीप’ नावाचा दोनमजली बंगला बांधला आहे. त्याच्या वरील मजल्यावर मी भाडेकरू ठेवले आहेत. त्यातून मला दरमहा उत्पन्न मिळते. तसेच सोलापूर येथे माझे स्वतःचे घर आहे, आलिशान गाडी घेतली आहे. मला मनाजोगी जागा मिळाली. त्यामुळे मी बाजारभावापेक्षा अनेक पटींनी जास्त किंमत मोजून मला हवी ती जागा विकत घेतली. आज माझे स्वतःचे ऑफिस आहे. माझ्याकडे सहा माणसे कामाला आहेत. माझे आई-वडील वृद्ध आहेत, पण मला आणि माझ्या थोरल्या भावाला सुखी पाहून त्यांचा वृद्धापकाळ आनंददायी झाला आहेमाझे मोठे बंधू दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, नगर या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली आहे. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, हे अगदी खरे आहे. कारण माझी पत्नी सौ. प्रियंका ही सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आमच्या लग्नाचासुद्धा एक मजेदार किस्सा आहे.

     मी प्रियंकाला एका लग्नात पाहिले होते. प्रथमदर्शनीच मी तिच्या प्रेमात पडलो. पण आम्ही तिला लग्नासाठी रीतसर मागणी घातली. तिचे वडील पोलीस खात्यात आहेत. बारावी शिकलेल्या इन्शुरन्स एजंटला आपली पदवीधर मुलगी कशी काय द्यायची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या भावाचे आणि माझे लग्न एकाच मंडपात करायचे असा आमच्या आई-वडिलांचा अट्टहास होता. मला दुसऱ्या मुलीची स्थळे येत होती, पण मी ठरवले होते की, लग्न करीन तर प्रियंकाशीच. यावरून घरात मोठे वाद झाले, सर्वांत धाकटा म्हणून मला मारही खावा लागला. माझे डेव्हलपमेंट ऑफिसर, इतकेच काय तर माझा खास मित्र संजय मंथा या सर्वांनी प्रियंकाच्या वडिलांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले, पण ते फोल ठरले. मी पण माघार घेणाऱ्यांपैकी नव्हतो. एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी २००२ पासूनचे माझ्या उत्पन्नाचे दाखले तसेच माझी स्थावर संपत्ती यांचा अहवाल तयार करून तो प्रियंकाच्या वडिलांसमोर सादर केला. मी विमा प्रतिनिधी असलो तरी काबाडकष्ट करून यशस्वी उद्योजक आणि एक श्रीमंत व्यक्ती म्हणून कसा नावारूपाला आलो, हे पद्धतशीरपणे सादर केले. त्यावेळेस २०१० पर्यंत माझे वार्षिक उत्पन्न सोळा लाखांपेक्षा जास्त होते. म्हणजे महिन्याला सुमारे एक लाख पस्तीस हजार रुपये होते. तसेच माझे विमा क्षेत्रातील भविष्य उज्ज्वल आहे, याची खात्री झाल्यामुळे माझ्या सासऱ्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला आणि त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत प्रियंकाशी माझा विवाह झाला. आज मला मनस्वी आणि यशस्वी या दोन मुली आहेत आणि आम्ही सुखाने संसार करत आहोत. माझी पत्नी प्रियंका ब्युटीपार्लरचा उद्योग करते तसेच माझ्या कामातही मला मदत करते.

  मी मोठा शासकीय अधिकारी होऊ शकलो नाही, मी प्राध्यापक होऊ शकलो नाही, मी डॉक्टर, इंजिनिअर, वकील होऊ शकलो नाही, पण आज एक विमा प्रतिनिधी झाल्यामुळे या सर्व विभागांतील व्यक्ती माझे विमा ग्राहक आहेत. त्यांच्यासारखेच दर्जेदार राहणीमान आणि रुबाबदार जीवनशैली मी अनुभवत आहे. याचे श्रेय मी भारतीय जीवन विमा निगम (एल.आय.सी.) या माझ्या मायबाप संस्थेला देतो. या संस्थेमुळेच मी अमेरिकेत जागतिक संमेलनाला हजर राहू शकलो. अमेरिकेचा व्हिसा मिळणे खूप कठीण असते, पण ईश्वरकृपेने तो मला मिळाला. मी लहान वयातच अमेरिका, सिंगापूर, दुबई इ. परदेश दौरे करू शकलो. मी डॉ. उमेश कणकवलीकर सरांना विचारले की अमेरिकेतून तुम्हाला काय भेटवस्तू आणू? तेव्हा ते मला म्हणाले, ‘भेट घ्यायचीच असेल तर मी लिहिलेले मी भारताला महासत्ता करणारच!’ हे पुस्तक अमेरिकेच्या दौऱ्यावर घेऊन जा आणि अमेरिकेच्या धरतीवर फोटो काढून मला पाठव. त्यांची ही इच्छा मी पूर्ण करू शकलो. याचे कारण एका शब्दात सांगायचे तर केवळ इच्छाशक्ती.

तरुण पिढीला मी असा मित्रत्वाचा सल्ला देतो की, विमा क्षेत्राला कमी लेखू नका. विमा प्रतिनिधी म्हणून काम करायला लाज बाळगू नका. कारण आज मी अभिमानाने सांगतो की, मी एक विजेता विमा प्रतिनिधी आहे. त्यामुळे माझे या वर्षाचे उत्पन्न अंदाजे पंचेचाळीस लाख रुपये असेल. मी व्हाइट इन्कम कमावतो आणि भरपूर इन्कम टॅक्स भरतो, याचा मला अभिमान आहे. ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ या आमच्या ब्रीदवाक्याला जागरूक राहून मी भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लावत आहे.’

(या लेखाच्या लेखकाची २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांच्या मी विजेता होणारच! या कार्यक्रमाचे ३५०० हून अधिक प्रयोग सादर झाले आहेत. त्यांचा email ID- nishamissionvijeta@yahoo.com असून त्यांचा भ्रमणध्वनी ९०२३३९३१११ आहे.)

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close