
ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळाली नवी ओळख ; जिद्द आणि संघर्षाची अनोखी यशोगाथा
शिवतंत्र न्यूज नेटवर्क
करमाळा तालुका प्रतिनिधी
ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळाली नवी ओळख ;जिद्द आणि संघर्षाची अनोखी यशोगाथा
करमाळा येथील कैलास यादव सर यांनी सुरुवातीच्या काळात असंख्य व्यवसाय प्रामाणिकपणे करत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांची अनोखी यशोगाथा तरुणाईला नक्कीच स्फूर्ती देणारी आहे.
कैलास बन्सी यादव, मुळगाव डोणगाव , तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. शिक्षण MSC DED . एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परिस्थिती बेताचीच होती . वडिलांचे 1989 मध्येच निधन झालेले.मात्र मनात जीगिशा प्रचंड होती. परिस्थिती बदलण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणासाठी वाटेल ते काम करत त्यांनी कधी कोणाच्या दुकानावर तर कधी मेडिकलवर पार्ट टाइम जॉब स्वीकारला. कष्टाची लाज त्यांनी कधीही धरली नाही. नंतर एका दुध डेअरीवर त्यांना काम मिळाले. या दुध डेअरीचे संकलन अगोदर 300 लिटर प्रतिदिन होते, मात्र कैलास यादव यांनी हात कामकाज हातात घेतल्यानंतर 300 लिटरचे संकलन 1300 लिटर पर्यंत गेले. अतिशय सचोटीने हे काम केले. मात्र चेअरमन यांच्या घरातील अंतर्गत कलहामुळे त्यांनी या क्षेत्राला रामराम ठोकला. त्यानंतर आष्टी येथील एका ऑटोमोबाईल मध्ये त्यांनी काही दिवस काम केले . फक्त अनुभवासाठी आणि आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे काम केले. बोअरवेल्स क्षेत्रात देखील त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तीन ते चार वर्षे त्यांनी इमाने इतवारे हा व्यवसाय केला मात्र. या व्यवसायात देखील यादव सर यांचे मन रमले नाही. त्यानंतर ज्यूस सेंटर देखील हा नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केला. गुणवत्तेच्या जोरावर दूरवरून असंख्य ग्राहक त्यांच्याकडे येत होते. सुमारे चार वर्षे त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे केला . मात्र नियतीला त्यांच्या हातून वेगळेच काम करून घ्यायचे होते. जागा दुसऱ्याची असल्यामुळे हा व्यवसाय फार काळ चालू शकला नाही . पावभाजी सेंटर देखील त्यांनी एक वर्ष चालवले. एक-दोन वर्षे लॉटरी सेंटर देखील त्यांनी चालवले. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह करमाळा तालुक्याचे जेष्ठ नेते विलासराव घुमरे सर यांच्या जवळच्या नात्यात झाला. 2002 – 2003 मध्ये त्यांना करमाळा येथील नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय येथे अध्यापनाचे काम मिळाले .अध्यापक विद्यालयात रुजू झाल्यानंतर त्यांनी त्यांचे D ED पूर्ण केले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्यामुळे ते विद्यार्थी वर्गात लाडके होते. 2009 मध्ये त्यांना करमाळा येथील दिगंबरराव बागल पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून जबाबदारी मिळाली. ज्यावेळी त्यांच्याकडे ही जबाबदारी आली होती त्यावेळी हा पेट्रोल पंप सुमारे 50 ते 60 हजार रुपये तोट्यात होता. कैलास यादव यांनी पदभार घेतल्यानंतर महिन्याचा नफा 18 लाखांवर गेला. शहर व परिसरातील व्यापारी नागरिक यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. 2017 पर्यंत असेच चालले. त्यानंतर त्यांनी हा जॉब सोडला.




